सोमवारी टोलबंद आंदोलन – सुजीत झावरे 

टाकळी ढोकेश्‍वर टोलनाक्यावर स्थानिकांची अडवणूक 

पारनेर । नगर सह्याद्री

नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर येथील टोलनाक्यावर परिसरातील गावांतील वाहनधारकांकडून अन्यायकारक टोल घेतला जात आहे. तो घेवू नये यासाठी सोमवार दि.17 रोजी सकाळी या टोलनाक्यावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे या परिसरातील ग्रामस्थांसह टोलबंद आंदोलन करणार आहेत.

नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी ढोकेश्‍वरजवळ या रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराने टोल नाका उभारला आहे. शासनाच्या आदेशानुसार टोल नाक्याच्या परिसरातील 20 किलोमीटरच्या परिसरातील गावांच्या नागरिकांकडून टोल न आकारण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र येथील टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांकडून शासनाच्या आदेशाला हरताळ फासून स्थानिक नागरिकांडून सर्रास टोलवसुली केली जात आहे.

ज्या शेतकर्‍यांच्या या रस्त्यात जमिनी गेल्या आहेत. त्यांच्याकडून देखील टोल घेतला जात आहे. त्यामुळे या अन्यायकारक टोलवसुली विरोधात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे आक्रमक झाले असून, या परिसरातील नागरिकांसह सोमवारी आंदोलन करणार असल्याचे झावरे यांनी सांगितले. या आंदोलनात धोत्रे, काकणेवाडी, ढोकी, वासुंदे, खडकवाडी, वडगाव सावताळ या गावांतील नागरिकांसह सोमवार दि.17 रोजी सकाळी आंदोलन करण्यात येणार आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!