जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुभाष गुंदेचा यांची फेरनिवड

अहमदनगर । नगर सह्याद्री

नगर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक ’नवा मराठा’चे संपादक सुभाष गुंदेचा यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी गुंदेचा यांना पुन्हा अध्यक्षपदावर संधी देण्याची सूचना संघाचे सहचिटणीस विठ्ठल लांडगे यांनी मांडली. तिला सर्वांनी अनुमोदन दिले. त्यानंतर गुंदेचा यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

नगर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांची महासभा सुभाष गुंदेचा यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार चौकातील पत्रकार संघाच्या नियोजित भवनात सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती. मागील बैठकीच्या इतिवृत्तास व मार्च 2019 अखेरच्या हिशेबास मंजूरी देणे, यासह 2019-21 या काळासाठी नवीन अध्यक्ष व पदाधिकारी निवड घोषित करणे आदी विषय त्यात होते.

सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. संघाचे सदस्य मुख्तार सय्यद, अशोक खांबेकर, गनिभाई शेख, सुखदेव फुलारी, रामदास ढमाले, अशोक तुपे, पद्माकर शिंपी, सुधीर मेहता, प्रकाश भंडारे, बाबा जाधव, रमेश कोठारी, समीर मण्यार, अन्वर खान, संजय वाघमारे, राजेश सटाणकर, श्रीराम बागडे, सुनील मुथा, आदींनी यावेळी मनोगते व्यक्त केली.

सुभाष गुंदेचा यांचे पत्रकार भवनासाठीचे आज पर्यंतचे योगदान आणि हे भवन पूर्णत्वास नेण्यासाठी पुढील दोन वर्षासाठी संघाच्या अध्यक्ष पदाची धुरा पुन्हा एकदा सुभाष गुंदेचा यांच्याकडेच देण्यात यावी अशी सूचना संघाचे सहचिटणीस विठ्ठल लांडगे यांनी मांडली. तिला सर्वांनी अनुमोदन दिले. त्यानंतर गुंदेचा यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर जिल्हाभरातील पत्रकारांच्या वतीने फेरनिवड झालेले सुभाष गुंदेचा यांचा सत्कार करण्यात आला.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!