गलत को गलत कहने की ताकद, हिंमत और जुर्रत रखो…!

 

पत्रकारितेशी संबंधित विविध भूमिकांमधून प्रवास करताना गेल्या सव्वीस वर्षात मला अनेकांचे पाठबळ मिळाले. खरे तर माझ्या या प्रवासात मी निमित्तमात्रच होतो. जे काही यश मिळाले ते सर्व तुमच्यामुळेच! अपयश अथवा कमी पडलो असेल तर मी! सहा वर्षांपूर्वी ‘नगर सह्याद्री’ दैनिकाचा प्रारंभ झाला. त्यात अनेक मित्राचा वाटा कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार! नव्या अध्यायाचा प्रारंभ केल्यानंतर आज कितपत यश मिळाले यासाठीचा तराजू मी तुमच्या हातात देतोय! परंतू या सार्‍या प्रवासात मी आणि माझ्या सहकार्‍यांनी तुम्हाला अपेक्षीत असणार्‍या भूमिकेशी प्रतारणा केली नाही याचा आनंद वाटतोय! वाचकहो, गलत को गलत कहने की ताकद, हिंमत और जुर्रत हमने रखी है, आप भी रखो! आमची ही भूमिका कायम राहणार आहे. सातव्या वर्षात पदार्पण करताना हा आमचा तुम्हाला शब्द आहे! वाचक हो, ‘सत्य नेहमी ताकदवान असते, ताकदवान नेहमीच शांत असतात… वादळ येण्यापूर्वी अशीच शांतता असते, म्हणूनच शांत वादळाला डिवचायचं नसतं कारण वादळाला छप्परच नसतं!‘, असंच काहीसं आमचं आहे! आमचा या क्षेत्रातील जन्मच मुळात शुन्यातला! वृत्तपत्र विक्रीतला! तुमच्याशी थेटपणे संवाद साधण्यासाठी आम्ही सातत्याने मांडत आलो आहोत तो तुमचा ‘सारिपाट’!
‘कफन सिर पे बांधे निकले है हम’ अशा टोकाच्या विद्रोही विचारतली ‘नगर सह्याद्री’ची टीम नाही, ती तुमच्या आमच्यातलीच आहे आणि म्हणूणच एक बाब अद्यापही खटकते. ‘जो हो रहा है, वो सब अच्छा है’ असं अगदी मनापासून तुम्ही मान्य केलं असलं तरी आम्ही ते मान्य करायला तयार नाही. चौकाचौकात आणि गावागावात बुजगावण्यांचं नसलेलं मोठेपण मान्य करण्यात धन्यता बाळगणार्‍यांची किव करावीशी वाटते! आम्ही गेल्या काही वर्षांपासून नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामधील दहशत, गुंडाराजच्या विरोधात खुलेपणाने भूमिका घेतली. ‘नगर सह्याद्री’च्या माध्यमातून तीच भूमिका आम्ही मांडत आलोय आणि तीच ‘नगर सह्याद्री’ची ओळख. मात्र, आम्ही हे सारं मांडत असताना आणि खुलेपनाने विरोध करतांना तुम्ही षंडपणा सोडला नाही हे आमचं दु:ख आहे. स्वत:ला दडवून ठेवण्याचे हे संस्कार नगरच्या मातीतले नक्कीच नाहीत! ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ स्वातंत्र्य यज्ञाचा हा महामंत्र लोकमान्य टिळकांनी नगरच्याच इमारत कंपनीत दिला. मग, पुढे काय? दोष कोणाचा? लोकमान्यांचा की इथल्या मातीचा? ही माती नक्कीच कमनशिबी नाही. आपल्या सो कॉल्ड डरपोक व्यक्तिमत्त्वाने तुम्ही या मातीला बदनाम करताय!
नगरकरांनो, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तरी खंबीर व्हा, नव्या नगरच्या निर्मितीसाठी तरी ठामपने बोलायला शिका, असत्य आणि अन्यायाच्या विरोधात कडवी भुमिका घ्या! एकदा समोर या आणि चांगल्याला चांगले अन् वाईटाला वाईट म्हणा! किती दिवस मुर्दाडपणात जगणार? चेहर्‍यावर खोटं हासू आणूण चेहरे नाही फुलवता येत. भिती, दहशत आणि त्याआड तुमचं खोटं हसणं दिसतेच तुमच्या चेहर्‍यावर! जिथे चुकीचे होत असेल तेथे त्याचा जाब विचारायला काय हरकत आहे. लाठ्या काठ्या किंवा तलवारी घ्यायला नाही सांगणार आम्ही तुम्हाला, त्यातून होणारी क्रांती ही शाश्‍वत नसते! आपल्या भावी पिढीचा विचार कधी करणार आहोत की नाही! किती दिवस हे असं मुर्दाडपणाचं लाळघोटेपणाचं वागणं चालू ठेवायचं! ‘गलत को गलत कहने की ताकद, हिंमत और जुर्रत रखो…’ बस एवढीच अपेक्षा आहे! आमचे नगरचे मातीवर आणि इथल्या माणसांवर प्रेम असले तरी तुमच्या मुर्दाडपणाने आम्ही व्यथित आहोत इतकेच!
‘नगर सह्याद्री’ नावाचा यज्ञ आम्ही तुमच्याच पाठबळावर सुरू केला. आता सातव्या वर्षात पदार्पण करताना आम्हाला आनंद होत असला तरी नगरकरांची मानसिकता का बदलत नाही हा आमच्यासमोरील प्रश्‍न आजही कायम आहे. निवडणुकांच्या निमित्ताने होणारं झुंडशाहीचं, दडपशाहीचं आणि प्रस्थापितांचं टोळबहिरं राजकारण आता गावागावात दिसणार आहे. गावागावातील टगोजी आणि टिकोजींना हाताशी धरत लाळघोटेपणाचं फड रंगणार आहेत. गावागावातील तरुणाई ढाब्यावर- गुत्यावर झिंगणार आहे व त्यातून अनेक घरं बरबाद होणार आहेत. या सार्‍या प्रक्रियेवर आमची नजर असणार आहेच! ज्यांच्या नावानं ढाब्यावर ही तरुणाई झिंगणार आहे त्या तरूणाईला आमचे काही सवाल असणार आहेत आणि ते आम्ही यथावकाश मांडणार आहोत. तूर्तास तरी आमच्या या वाटचालीत सहयोग देणार्‍या, दिशा देणार्‍या आणि पाठबळ देणार्‍यांचे आम्ही आभार मानतो!
नगरकरांसाठी चांगले सक्षम असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करताना हे वृत्तपत्र म्हणजे विविध जाहीराती एकत्र करून छापलेले ‘जाहिरातींचे उत्तम पॅम्पलेट’ अशी आमची ओळख आम्ही होऊ दिली नाही आणि होऊ देणार पण नाही. संपादकीय संस्कार आणि संपादकीय भूमिका नगरकरांना अपेक्षीत आहे आणि त्या अपेक्षेला उतरण्याचा आम्ही प्रयत्न चालविला आहे. सातव्या वर्षात पदार्पण करताना आम्ही आमची भूमिका पुन्हा एकदा सविस्तरपणे मांडणार आहोतच! तूर्तास या वाटचालीत सहकार्य करणार्‍या सर्वच घटकांचे आभार आणि भविष्यातील वाटचालीसाठी सहयोगाची अपेक्षा !

शिवाजी शिर्के
संपादक
नगर सह्याद्री

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!