सारिपाट / शिवाजी शिर्के…….. सर, तुम्ही सुद्धा! ‘प्राथमिक’चे गुरुजी ताळ्यावर; ‘माध्यमिक’चे मास्तर रानोमाळ!

 

स्वच्छ आणि चारित्र्यसंपन्न शिक्षकांचा जिल्हा म्हणून कधीकाळी ओळख राहिलेल्या नगर जिल्ह्याची ओळख ‘गोंधळी’ मास्तरांचा आणि गुरुजींचा जिल्हा झाला अशी झाली. समाज ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतो, त्याच शिक्षकांनी अशा पद्धतीने स्वत:ची मान घालविणारी ओळख निर्माण केली हे दुर्दैव! आदर्शाचे वास्तूपाठ आम्हीच जपायचे का असा काहीसा चुकीचं समर्थन करणारा सवाल यातील काहींकडून उपस्थित होणार असेल तर तेही दुर्दैवच! जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक गोंधळी आणि बेवडे झाले असल्याचा मेसेज समाजात गेल्यानंतर आताशी कुठे भानावर आले असताना माध्यमिकचे शिक्षक ताळतंत्र सोडून का वागू लागलेत हे कळेनासे झाले आहे.

जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या सोसायटीची वार्षिक सभा नुकतीच पार पडली. या सभेत नोकरभरतीसह अन्य मुद्यांवर गोंधळ झाला. खुर्च्यांची फेकाफेक करण्यापर्यंत मजल गेली. विषय समजून घेण्यापेक्षा गोंधळ कसा निर्माण होईल याची काळजी जशी सत्ताधार्‍यांनी घेतली तशीच ती विरोधकांनीही! कारण, विरोधी संचालक सभेमध्ये ‘गुळणी’ धरून बसले यातच सारे काही आले! ऐरवी पत्रकबाजीत आघाडीवर असणारे संचालक आणि त्यांचे समर्थक असे अचानक गपगार बसतात याचा अर्थ काय असा थेट सवालच या बैठकीत जाहीरपणे त्यांच्याच समर्थकांनी उपस्थित केला.

जिल्ह्यातील शिक्षकांच्या बँकेची सर्वसाधारण सभा आणि त्यात होणार्‍या गोंधळातून थेट पोलिस ठाण्यापर्यंत गेलेला वाद जिल्ह्यातील सर्वांनी पाहिला. खरेतर प्राथमिक शिक्षकांची प्रतिमा मलिन झाली ती त्यातूनच! प्राथमिक शिक्षक बँकेत सत्तेत आलेल्या प्रत्येक मंडळाने ही बँक किती खाऊ आणि किती नको अशी करून ठेवली. हे सारे करताना सत्तेतून पायउतार झाल्यानंतर सत्तेत आलेल्या मंडळाच्या विरोधात याच चोरांनी साव आणण्याचा प्रयत्न केला. त्यातून प्रत्येक सभेत गोंधळ वाढत गेला. साखर कारखान्यांच्या सर्वसाधारण सभांना लाजवील असे वर्तन शिक्षकांनी केले. नव्हे त्यांना तसे वर्तन करण्यास उद्युक्त केले गेले. तशी काळजी मास्तरांच्या नेत्यांनी घेताना रात्रभर नशेचा अंमल त्या मास्तरांवर कसा राहिल आणि सकाळी त्याच अंमलाखाली हे मास्तर गोंधळ कसा घालतील याचे नवीन प्रशिक्षण मध्यंतरी शिक्षक नेत्यांनी मास्तरांना दिले. त्यातून सार्‍याच शिक्षकांच्या भूमिकेबद्दल आणि त्यांच्या प्रतिमेबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. पोतेभरुन नोटांची बंडले नेल्याचे प्रकरण कधीकाळी गाजले होते. त्यानंतर सभा गाजत गेल्या. मात्र, गेल्या दोन- तीन वर्षांपासून शिक्षकांनी आणि त्यांच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण केले आणि आपली प्रतिमा आपणच सुधारली पाहिजे अशी भूमिका घेतली. त्यातून सभा शांततेत होऊ लागल्या. रावसाहेब रोहोकले यांच्या नेतृत्वाखाली गुरुमाऊली मंडळ सत्तेत आले आणि सर्वसाधारण सभेतील सर्व सदस्यांच्या शंकांचे निरसण करेपर्यंत सभा चालविण्याची भूमिका रोहोकले यांनी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली. त्यातून सभा शांततेत होऊ लागल्या आणि गोंधळी मास्तरांची प्रतिमा चांगली होऊ लागली.

प्राथमिकच्या गुरुजींना हे जमले असताना माध्यमिकच्या मास्तरांना हे का जमू नये? माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्ये भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखालील मंडळ सलग दुसर्‍यांदा मोठ्या मताधिक्याने सत्तेत आले. विरोधकांनी त्यांच्या मंडळाला पराभूत करण्यासाठी जंगजंग पछाडूनही काहीही उपयोग झाला नाही. आता साधारणपणे वर्षभरावर सोसायटीची निवडणूक आली असताना त्यांचे विरोधक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सत्ताधार्‍यांच्या बुरखा फाडण्यास सरसावलेले दिसतात. अर्थात लोकशाहीमध्ये चुकीच्या कामाला समर्थन देणे ही चुकच! मात्र, ज्या पद्धतीने हा विरोध नोंदविला पाहिजे आणि मुद्दे मांडले पाहिजे ते न मांडतान आक्रस्ताळेपणाने मास्तरांनी ते मांडले. त्यातून तमाम माध्यमिक शिक्षकांची प्रतिमा मलिन झाली हे दुर्दैव!

सोसायटीच्या लेखापरीक्षकाचा मुद्दा उपस्थित झाल्यावर विरोधकांसह सभासदांनी सत्ताधार्‍यांना धारेवर धरले. कमी पैसे घेणार्‍या लेखापरीक्षकाच्या नियुक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर हा गदारोळ थांबला गेला असला तरी नोकरभरतीवरून सत्ताधरी व विरोधक चांगलेच भिडले. या सर्व गोंधळात या सभेत कोणताही ठराव झाला नाही आणि ती सोयीस्करपणे गुंडाळण्यात आली. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांचीही ही मिलीभगतच म्हटली पाहिजे. सोसायटीमध्ये अध्यक्ष हे नामधारी असल्याचा जुनाच आरोप आताही झाला. मात्र, आर्थिक शिस्तीचा विचार करताना कुशल प्रशासकीय नेतृत्व संस्थांमध्ये आवश्यक असते. भाऊसाहेब कचरे हेही त्यातीलच एक! भास्कर कानवडे किती बोलले यापेक्षा संचालक मंडळाची सामुदायिक जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीतून कचरे हे बोलले असतील इतकेच! दुचाकी चोरीचे प्रकरण व्यासपीठावर येताच सोसायटीने ही दुचाकी घेऊन देण्याची मागणी संबंधित शिक्षक असणारा सभासद करतो आणि समोर उपस्थित सभासद त्याच्या मागणीला पाठींबा देतात यापेक्षा दुर्दैव ते कोणते?

सभासदांच्या मुलींप्रमाणे मुलांच्याही लग्नाला आता १५ हजार रुपये देण्याचे सभेत ठरत असताना बँकेतील गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर सभासदांनी नोकरभरतीवरून सत्ताधार्‍यांना धारेवर धरले. कचरे यांच्या उत्तरावर विरोधकांचे समाधान न होता गदारोळ सुरू झाला. सत्ताधारी-विरोधक एकमेकांना भिडले व या गदारोळात सभा आटोपती घेण्यात आली. मास्तरांची सोसायटी आणि त्या सोसायटीच्या वार्षिक सभेत एकही विषय चर्चेत न येता ही सभा गुंडाळली गेली. आता कायदेशिर चौकटीत ही सभा बसणार का हा सवाल आहेच!

प्राथमिक शिक्षकांची प्रतिमा सुधारत असताना माध्यमिकचे शिक्षक असे खुर्च्या फेकाफेकी करीत रानामोळ होणे यासारखे दुर्दैव नाही. आता माध्यमिक मधील सर्वच संघटनांनी याबाबत मंथन करण्याची आवश्यकता आहे. प्राथमिकचे गुरुजी रावसाहेब रोहोकले यांच्यासारख्या नेतृत्वामुळे शांतपणे सर्वसाधारण सभा घेऊ लागले असताना माध्यमिकच्या शिक्षकांनी त्यांच्याकडून काही आदर्श घेण्याची आवश्यकता आहे इतकेच!

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!