सारिपाट/ शिवाजी शिर्के……वाळू तस्करी जोमात; प्रशासन कोमात!

जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख दोघांच्याही नाकावर टिच्चून चोर झाले मुजोर

सारिपाट/ शिवाजी शिर्के

जिल्ह्यातील वाळू तस्करी थांबल्याचा दावा करणार्‍या पोलिस आणि महसूल प्रशासनाचे पितळ त्यांच्यातील घरभेद्यांनी अखेर उघडे पाडले. महसूल आणि पोलिस दलातील काही भ्रष्ट अधिकारी- कर्मचार्‍यांनी संगनमत करीत थांबलेली वाळू तस्करी पुन्हा एकदा खुलेआम चालू केली. या संपूर्ण प्रक्रियेत पोलिस दलातील काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांची ‘मोलाची’ भूमिका राहिली आहे. वाळू तस्करांनी सरकारी राजाश्रय मिळाल्याने खुलेआम तस्करी चालू केली असताना प्रशासन प्रमुख असणारे पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी नक्की काय करत आहेत असा थेट सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून ईशू सिंधू हे दाखल झाले. खमका पोलिस अधिकारी अशी ओळख असणार्‍या सिंधू यांच्या आगमनानंतर जिल्ह्यातील सारेच अवैध धंद्यावाल्यांची झोप उडाली. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा, अशी ताकीद प्रारंभीच्या काही दिवसातच (महिन्यात नव्हे) सिंधू यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या कारभार्‍यांना दिली. विशेषत: वाळू तस्करी थांबवा असा आदेश देताना ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाळू तस्करी सापडेल त्या पोलिस ठाण्याच्या कारभार्‍याची गय ठेवली जाणार नाही अशी ताकीदच त्यांनी बैठकीत दिली. सिंधू यांच्या कामकाजाची पद्धत आणि त्यांच्याबद्दल सर्वच पोलिस ठाण्यांचे कारभार्‍यांना माहिती होते. त्यामुळे बहुतांश ठाणे प्रमुखांनी वाळू वाल्यांना सांगावा धाडला आणि तस्करांच्या गाड्या रस्त्यावर दिसायच्या बंद झाल्या.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना काही नदीपात्रांमधून राजरोसपणे वाळू तस्करी झाली तर काही ठिकाणी छुप्या पद्धतीने! जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या महसूल प्रशासनाला आणि सर्व तहसीलदारांना वाळू तस्करांच्या विरोधातील मोहीम व्यापक करण्याच्या सुचना दिल्या. मात्र, त्या सुचना कागदावरच राहल्या की काय अशी शंका आता उपस्थित होत आहे. जिल्हाधिकार्‍यांनी वाळू तस्करांच्या विरोधात मोहीम व्यापक करण्याच्या सुचना, आदेश दिले असले तरी त्याला तहसीलदारांनी कृतीची जोड दिल्याचे दिसून येत नाही. पर्यायाने वाळू तस्करांचे फावत असले तरी त्याला आशीर्वाद कोणाचे आहेत हे आता लपून राहिलेले नाही.

श्रीगोंदा, कर्जत तालुक्यात राजरोसपणे वाळू तस्करी चालू असल्याचे दोन दिवसांपूर्वीच समोर आले. राजापूर (श्रीगोंदा) येथील वाळू तस्करीची माहिती देणार्‍यावर प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत तस्करांची मुजोरी वाढली आहे. वाहन अंगावर घालून थेट संबंधिताला चिरडण्यापर्यंत वाळू तस्करांची मजल गेली असल्याचे राजापूरमध्ये स्पष्ट झाले. तस्करांना नक्कीच राजाश्रय आहे आणि तो राजकीय जसा आहे तसाच प्रशासकीय!

पोलिस अधीक्षकांच्या खमक्या भूमिकेमुळे बंद पडलेले वाळू तस्करांचे ठेले, त्यांच्या बैठकांच्या जागा आणि चौकाचौकातील हेरगिरीचे पॉईंट पुन्हा एकदा चालू झाले आहेत. त्याच्या जोडीने सुरु झालीय ती वाळू तस्करी! तस्करांची वाळू वाहने आता बहुतांश सर्वच नदीपात्रातून सुसाट धावू लागली आहेत. संबंधित पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील अधिकारी- कर्मचार्‍यांची मीठ-पाणी त्यातून आपोआप चालू झाले आहे. जवळपास दोन महिने ही तस्करी बंद होती आणि पोलिस अधीक्षक ईशू सिंधू या विषयावर गंभीर होते. मात्र, आता जवळपास आठवड्यापासून जिल्ह्याच्या बहुतांश नदीपात्रातून वाळू तस्करी जोमात चालू आहे. वाळू तस्करांची वाळूने भरलेली वाहने पोलिसांच्या समक्ष चौकाचौकातून धावत असताना ती थोपविण्याची धमक पोलिस जशी दाखवत नाहीत तशीच महसूलची यंत्रणाही! पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनाच आता हातात दंडुका घेऊन चौकात आणि नदीपात्रात उतरावे लागेल असे दिसते! तरच ही तस्करी थांबेल; नसता…. आणखी सुसाट सुटेल!

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!