सारिपाट / शिवाजी शिर्के…… राष्ट्रवादी : भाकरी, पीठ अन् प्रचंड आशावादी

स्थापना दिवस

स्थापना दिवस : आत्मचिंतन कोणी करायचे? शरद पवार म्हणतात, भाकरी फिरवली पाहिजे; रोहीत पवार म्हणतात, पिठ देखील बदलावं लागेल!

सारिपाट / शिवाजी शिर्के

सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माच्या मुद्दावर कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. त्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आज वीसावा वर्धापन दिन! १९ वर्षांचा प्रवास या राजकीय पक्षाने आणि पर्यायाने शरद पवार यांच्या सैन्याने केला. २५ मे १९९९ रोजी नोंदणी झालेल्या या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा आजच्या दिवशी म्हणजेच १० जून रोजी करण्यात आली. म्हणूनच हा दिवस महत्वाचा! स्थापना दिनाचे औचित्य साधून नगरसह संपूर्ण राज्यात दुपारपर्यंत झालेले कार्यक्रम आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद आत्मचिंतनास भाग पाडणाराच म्हटला पाहिजे. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्‍वास वाढीस लागावा यासाठी शरद पवार हे स्वत: बैठका घेत असताना कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य, उत्साह दिसायला तयार नाही! भाकरी फिरवायची भाषा पवार साहेब करीत असताना त्यांचे नातू रोहीत पवार भाकरीच्या जोडीने पीठ देखील बदलावं लागेल असं सुचक बोललेत! आजोबा- नातू हे सारेच प्रचंड आशावादी असले तरी बाकीच्यांमध्ये हा प्रचंड आत्मविश्‍वास काही केल्या दिसायला तयार नाही आणि हीच परिस्थिती पक्षासाठी घातक ठरणारी आहे!

राष्ट्रवादी कॉंगेस पक्षाची स्थापना झाली त्या १९९९ सालात झालेल्या तेराव्या (१९९९) लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकूण १३२ जागा लढविल्या आणि या उमेदवारांना ८२ लाख ६० हजार ३११ मते मिळाली होती व पक्षाचे आठ खासदार निवडून आले होते. चौदाव्या (२००४) लोकसभेत पक्षाने ३२ जागा लढविल्या आणि ९ जागा जिंकताना पक्षाला ७० लाख २३ हजार १७५ मते मिळाली. पंधराव्या (२००९) लोकसभेत पक्षाने ६८ जागा लढविल्या व ९ जागा जिंकताना पक्षाला ८५ लाख २१ हजार ५०२ मते मिळाली. सोळाव्या (२०१४) लोकसभेत पक्षाने ३६ जागा लढविल्या व ६ जागा जिंकताना पक्षाला ८६ लाख ३५ हजार ५५८ मते मिळाली. नुकत्याच म्हणजेच २०१९ च्या झालेल्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने ३५ जागा लढविल्या, पाच जागा जिंकल्या आणि एकूण ८४ लाख ८३ हजार ६३२ मते मिळाली.
लोकसभेच्या जोडीने विधानसभा निवडणुकीची आकडेवारीही बरीच बोलकी आहे. पक्षाची स्थापना होताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत (१९९९) पक्षाने २२३ जागा लढविल्या व ५८ जागा जिंकताना पक्षाला ७४ लाख २५ हजार ४२७ मते मिळाली. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने १२४ जागा लढवून ७१ जागा जिंकल्या व ७८ लाख ४१ हजार ९६२ मते मिळवली. २००९ च्या निवडणुकीत ११३ जागा लढविल्या, ६२ जागा जिंकल्या आणि पक्षाला एकूण ७४ लाख २० हजार २१२ मते मिळाली. सन २०१४ च्या निवडणुकीत पक्षाने २७८ जागा लढविल्या, ४२ जागा जिंकल्या व एकूण ९१ लाख २२ हजार २८५ मते पक्षाला मिळाली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची स्थापना झाल्यापासून मिळालेली मते आज आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी आहेत. देशाचे भावी पंतप्रधान म्हणून पक्षाची स्थापना झाल्यापासून सारेच पवार यांच्याकडे पाहत होते आणि तसा जाहीरपणे नामोल्लेखही करीत होते. मात्र, स्वत: पवार यांना परिस्थितीची जाणिव होती. पक्षाच्या स्थापनेपासूनच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ही लाभार्थ्यांची पार्टी म्हणून ओळखली जात होती आणि ही ओळख पुसण्यासाठी नव्हे तर ती अधोरेखीत कशी होईल याची काळजी स्वत: अजित पवार यांच्यापासून सार्‍यांनीच घेतली होती. भपकेबाज राहणीमान, उच्चभ्रू अलिशान वाहनांमधून फिरणार्‍यांच्या टोळ्या आणि त्या टोळ्या पोसणार्‍या अपप्रवृत्ती वाढत गेल्या. पक्षाच्या स्थापनेपासून कालच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळत गेलेली मते वाढण्याऐवजी कमी होत गेली हे त्याचेच प्रतीक मानले पाहिजे.

सामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी माणून काम करण्याऐवजी त्याच्या खिशाकडं पाहून काम करणार्‍या अवलादी पक्षात वाढीस लागल्या आणि तिथेच या पक्षाची उलटगणती सुरू झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील क्रमांक दोनचा घटक म्हटल्या जाणार्‍या पंचायत समितीपासून जिल्हा परिषद, आमदारकी अशा टप्प्यांवर निवडून आलेल्या आणि पदाधिकारी म्हणून निवड झालेल्या कितीजणांनी पक्ष संघटना वाढीसाठी, जनतेसाठी प्रामाणिक काम केले. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना अनेकांच्या मालमत्ता पाच वर्षात पन्नास पटीने वाढल्या! त्या कशा वाढल्या याची साधी विचारणा केली गेली असती तर शुद्धीकरणाची प्रक्रिया कधीच झाली असती. आज जे काही झाले ते अपचनाने! काहीही खाल्याने अपचन होणारच! तसेच झाले! त्यातूनच मग हा राजकीय पक्ष, त्यांचे काही नेते (शरद पवार यांचा अपवाद) सामान्य जनतेला आपलासा वाटू लागला नाही. कोणतेही काम कमिशन, पाकीट घेतल्याशिवाय करायचेच नाही असाच काहीसा अलिखीत नियम झाला आणि त्यातून पक्षाचे अतोनात नुकसान झाले. आत्मचिंतन करायचे ते कोणी? स्वत: शरद पवार यांना या वयात देखील पुन्हा १९९९ प्रमाणे पक्ष, पक्षाचे चिन्ह घेऊन मतदारांसमोर जावे लागत असेल तर…!

पवारांचे नातू रोहित पवार यांनी स्थापना दिनाचे औचित्य साधून आज सोशल मिडियावर टाकलेली पोस्ट खुपच व्हायरल झाली. त्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, ‘आज पक्षाचा २० वा वर्धापन दिन. १९ वर्षाच्या या प्रवासात आपण १५ वर्ष सत्तेत होतो. या १५ वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य हे सर्वांगिण विकासात देशात नंबर एकचे राज्य म्हणून गणले जायचे. पण सातत्याने सत्ता असण्याचे जसे फायदे असतात तसे काही दोष देखील असतात. अनेकांच्या मते, सत्ता असताना झालेली कामे लोकांपर्यन्त पोहचवण्यास आपण कुठेतरी कमी पडलो. सातत्याने सत्तेत राहिल्यामुळे त्याच त्या पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली, त्यातून नवीन लोकांना संधी मिळाली नाही आणि जून्या लोकांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद ठेवण्यास महत्व दिलं नाही. त्यातूनच लोकांपर्यन्त पक्षाची कामे पोहचवण्यास आपण कमी पडत गेलो. त्याच त्या लोकांना पक्षामार्फत संधी देण्यात आल्याची नाराजी पक्षात देखील वाढू लागली. या सर्वांचा एकत्रित परिणाम पक्ष संघटनेवर झाला. हे पाहूनच साहेब भाकरी फिरवण्याबाबत बोलले असावेत, काहीअंशी तर भाकरी फिरवण्यासोबत पिठ देखील बदलावे लागणार असल्याचं जाणवतं. २० वा वर्धापन दिन म्हणजे तरुणांच्या वयाप्रमाणे २० वर्ष समजून तरुणांना अधिकाधिक संघी देत पक्षसंघटना वाढवण्यास भर देण्यात यावा, पक्षासोबतच प्रचंड आशावादी मी राष्ट्रवादी जोडलं गेलं आहे. याच विचाराने आपण पुढचं लक्ष्य साध्य करु. अस पक्षाचा एक तरुण कार्यकर्ता म्हणून मला वाटतं’. – रोहित पवार.

पवारांचा नातू रोहीत पवार भाकरीच्या जोडीने आता पीठ बदलावं लागेल असं सुचक बोलून गेलाय. रोहितचं हे सुचक विधान बर्‍याच अंगाने बोलके आहे. पीठ बदलावं लागेल म्हणजे नक्की काय? राष्ट्रवादीच्या चक्कीरुपी जात्यात आतापर्यंत जे पीठ तयार झालं ते पीठ बदलायचं म्हणजे पीठ ज्यापासून तयार होतं ते धान्यच बदलावं लागेल. रोहीत पवार यांनी वरिल पोस्टमध्ये नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे असं म्हणताना, ‘ सातत्याने सत्तेत राहिल्यामुळे त्याच त्या पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली, त्यातून नवीन लोकांना संधी मिळाली नाही आणि जून्या लोकांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद ठेवण्यास महत्व दिलं नाही. त्यातूनच लोकांपर्यन्त पक्षाची कामे पोहचवण्यास आपण कमी पडत गेलो. त्याच त्या लोकांना पक्षामार्फत संधी देण्यात आल्याची नाराजी पक्षात देखील वाढू लागली. या सर्वांचा एकत्रित परिणाम पक्ष संघटनेवर झाला’, असं थेटपणे मांडले आहे.

जुन्यांना बाजूला सारण्याची धमक दाखवायचीच असेल तर त्यास वाघाचं काळीज लागेल. कारण पक्षाच्या स्थापनेपासून गेल्या वीस वर्षात पक्षामध्ये अनेक वजनदार मस्तवाल वाघ तयार झालेत! हे मस्तवाल वाघ घरी बसवले तर पक्षाचे दहा आमदार सुद्धा ते निवडून येऊ देणार नाहीत याची जाणिव शरद पवार यांना नक्कीच असणार आहे. मस्तवाल वाघांना, त्यांच्या पोरासोरांना संधी द्यायची की पीठ बदलून नव्यांना संधी द्यायची यावरच आता पक्षाचे अस्तित्व पणाला लागणार आहे. पुढील तीन महिन्यात यावर मंथन झाले नाही तर आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावून बसलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला राज्य पातळीवरचा दर्जाही राहतो की नाही याबाबत साशंकता आहे. बाकी सारे स्पष्ट चित्र पाहण्यासाठी सार्‍यांनाच उत्सुकता आहे ती विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला मिळणार्‍या मतांची आणि किती आमदार निवडून येतात याची! तूर्तास तुम्ही- आम्ही सारेच ‘प्रचंड आशावादी’ राहू या!

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!