सारिपाट / शिवाजी शिर्के…… पोलिसाला पळूपळू बेदम हाणलं; ते पण बेवड्यांनी!

एसपी साहेब, खाकी वर्दीचा धाक संपलाय का? | टपोर्‍या मवाल्यांची मुजोरी, मस्ती वाढलीय | खून, दरोडे, चोर्‍यांच्या जोडीने ‘मंगळसुत्र’ देखील झाले असुरक्षीत

सारिपाट / शिवाजी शिर्के

देशात- राज्यात ‘राज्य’ कोणाचेही असू देत! नगर जिल्ह्यात राज्य आहे ते गुंडमवाल्यांचे! टपोर्‍यांचे! चोरांचे! तडीपार गुंडांचे! न्यायालयीन आदेशाचे राजरोस उल्लंघन करणार्‍यांचे! हे सारे कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय शक्यच नाही! या सार्‍यावर नियंत्रण, वचक कोणाचा असतो तर पोलिसांचा! मग हे सारे जर राजरोस चालू असेल तर त्याला आशीर्वादही पोलिसांचाच म्हणायचा का? बेवड्यांच्या टपोरीछाप टोळीने यात्रेतील बंदोबस्तासाठी तैनात असलेला पोलिस कर्मचारी (ड्रेसवर) बेदम मारला! जीव वाचविण्यासाठी हा पोलिस पळू लागल्यावर त्या टपोर्‍यांनी त्याचा पाठलाग केला आणि पुन्हा बेदम मारहाण केली. एसपी साहेब, हे सारं आपल्या नगर जिल्ह्यात चालू आहे. खाकीची अब्रू अशी लुटली जात आहे आणि सारे अधिकारी हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.

शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत असल्याचा दावा जर केला जात असेल तर साफ खोटे! चोर्‍या, दरोडे थांबले का? नाही! अर्थात हे थांबणार पण नाही. त्याचे प्रमाण वाढत चालले आहे आणि दुष्काळाची दाहकता अशीच वाढत गेली, पाऊस झाला नाही तर त्यात भरच पडणार! रस्त्याने पायी चालणार्‍या, दुचाकीवर चालणार्‍या महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र सुरक्षीत राहिले नाही. दुकानदार सुरक्षीत राहिले नाहीत. टाकळी ढोकेश्‍वर आणि कोपरगाव या दोन्ही ठिकाणी दुकानदारांच्या हातातील रोकड असलेली पिशवीच पळवून नेण्यात आली. तपास चालू असल्याचं सांगितलं जाते. पण तो तपास कधी पूर्ण होणार याचं कोणतंही उत्तर पोलिस देऊ शकत नाहीत.

पोलिस अधीक्षक म्हणून नव्यानेच आलेले ईशू सिंधू यांच्या कामाची झलक अद्यापही दिसायला तयार नाही. मागील आठवड्यात त्यांनी पोलिस ठाण्यांचे कारभारी बदलले. नव्या अधिकार्‍यांनी त्या- त्या पोलिस ठाण्यांचा पदभार घेतला. काही ठिकाणी आणखी नवीन बदल होण्याच्या मार्गावर आहे. हे सारे प्रशासकीय सोपस्कर असले तरी सामान्य माणसाच्या मनामध्ये सुरक्षीततेची भावना निर्माण करण्यात पोलिस दल कमी पडत आहे. मुळात सामान्य माणसापेक्षाही आज पोलिसांच्या मनातच असुरक्षीततेची भावना निर्माण झाली आहे. श्रीगोंद्यात पोलिसाला बेदम चोप देण्यापर्यंत मजल गेली असताना त्या पोलिस ठाण्याचे कारभारी आरोपींना पकडू शकलेले नाही.

पिसोरे खांड (श्रीगोंदा) येथील खाकीबा डोंगरावर भरलेल्या आषाढी यात्रेमध्ये संजय कोतकर या पोलिस कर्मचार्‍यावर काही गुंडांनी जीवघेणा हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. काय घडलं नेमकं तिथे! आषाढ महिन्याच्या निमित्ताने खाकीबा डोंगरावर खाकीबाचा उत्सव असतो आणि त्या ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी होत असते. संजय कोतकर हे वाहतूक नियंत्रणाचे काम करत असताना एका तरुणाने रस्त्यात गाडी उभी करत वाहतुकीस अडचण निर्माण केली. त्याला समाजाऊन सांगण्याचा प्रयत्न कोतकर यांनी केला. त्याचा तरुणास राग आला व पोलिस कर्मचारी कोतकर यांना शिवीगाळ केली असता, कोतकर यांनी त्या तरुणाला ताब्यात घेत दुचाकी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात पाठीमागून सात ते आठ गुंड तिथे आले व त्यांनी संजय कोतकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या वेळी यात्रेमध्ये असलेल्या अनेकांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस कर्मचारी आणि खात्या विषयी त्यांनी अपशब्द वापरत मारहाण केली. कोतकर हा पोलिस कर्मचारी असल्याचे समजल्यावर त्यांनी जीव वाचविण्यासाठी पळत सुटलेल्या कोतकर याच्यावर पुन्हा हल्ला करून जबर मारहाण केली. या हल्ल्यात पोलिस कर्मचारी कोतकर हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसपी साहेब, पोलिस कर्मचार्‍याला अशा पद्धतीने बेदम चोप देण्यापर्यंत समाजकंटकांची मजल गेली असताना आपण प्रशासन प्रमुख म्हणून तुमच्याच सैन्याची काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. खाकी वर्दीला आता कोणीही हात लावू शकते असा चुकीचा संदेश यातून जावू नये. त्याची काळजी आता आपल्यालाच घ्यावी लागणार आहे.

खाकीचा आणि पर्यायाने कायद्याचा धाक संपल्यासारखी परिस्थिती एका बाजूला निर्माण झाली असताना दुसरीकडे हद्दपार केलेले आरोपी राजरोसपणे चौकाचौकात मोकाटपणे फिरत आहेत. केडगावमधील कराळे हे त्याचे उत्तम उदाहरण! कराळे हद्दपार असतानाही केडगावमध्ये येतो. याबाबत दाखल गुन्ह्याचा तपास ज्याच्याकडे सोपविण्यात आला आहे, त्या पोलिस कर्मचार्‍यास कराळे याचे वडील धमकावू लागले आहेत. पोलिसच आज दहशतीखाली आले आहेत आणि त्यात अशा घटनांमुळे वाढच झाली आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामिन फेटाळला असताना सेनेचे नेते थेट मुख्यमंत्र्यांना भेटतात. मुख्यमंत्रही हसतहसत त्यांचे स्वागत करतात. या घटनाक्रमातून नक्की काय संदेश द्यायचा आहे मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या गृहखात्याला? कोणाचाच कोणाला धाक राहिला नाही आणि ज्याचे-त्याचे स्वतंत्र असे नियम झाले आहेत. जिल्ह्यात अशीच परिस्थिती राहिली तर अराजक माजल्याशिवाय राहणार नाही आणि त्यास सर्वस्वी जबाबदार असतील ते पोलिसच!

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!