सारिपाट / शिवाजी शिर्के…… पहिल्याच घासाला शिवसेनेला मीठाचा खडा

नगर शहराच्या जागेसाठी भाजपा सरसावली

दिलीप गांधी समर्थक नगरमधून लागले तयारीला | शिर्डीतही करावी लागणार तडजोड

सारिपाट / शिवाजी शिर्के

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्यानंतर विधानसभेच्या नगर जिल्ह्यातील १२ जागा जिंकण्याचा चंग राधाकृष्ण विखे पाटील यांनी बांधला आहे. विखे पाटील हे भाजपात दाखल होत असल्याने जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढविण्यावरच त्यांचा भर असणार आहे. नगर शहरातून लोकसभेसाठी डॉ. सुजय विखे पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर व मागील निवडणुकीत सेना उमेदवार पराभूत झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही जागा भाजपाकडे आणि पर्यायाने माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासाठी मिळावी असा प्रयत्न चालू आहे. गांधी यांची उमेदवारी अंतिम झाल्यास त्यांचा विजय निश्‍चित होऊ शकतो असा त्यांच्या समर्थकांचा दावा आणि त्यातही खासदार असताना अभावानेच महापालिकेच्या अधिकार्‍यांची बैठक घेणारे गांधी काल अचानक मनपात अधिकार्‍यांची बैठक घेऊन गेल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नगर शहरासह शिर्डीची जागाही विखे पाटलांसाठी सेनेला सोडावी लागणार हे नक्की!
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात पुन्हा युतीची सत्ता येणार असल्याचे संकेत मिळत असताना भाजपापेक्षा सेनेच्या जागा जास्त कशा निवडून येतील याची काळजी आतापासूनच सेनेच्या नेतृत्वाने घेण्यास प्रारंभ केला आहे. भाजपाचा आमदार असणार्‍या जागा भाजपाकडे आणि सेनेचा आमदार असणार्‍या जागा सेनेकडे असे पहिल्या टप्प्यातील सुत्र आहे. कर्जत-जामखेड, राहुरी, पाथर्डी, नेवासे, कोपरगाव येथे भारतीय जनता पक्षाचे आमदार असल्याने शिवसेनेने या जागांवरील आपला हट्ट सोडून दिल्यात जमा आहे. पारनेरला विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी हे आमदार आहेत. त्यांची ही जागा सेनेकडे कायम असला तरी शिवसेनेने श्रीरामपूर, अकोले, संगमनेर, राहाता, पारनेर, श्रीगोंदा, नगर या जागांची मागणी कायम ठेवली आहे.
श्रीगोंद्याची जागा शिवसेनेकडे आहे. मात्र, बबनराव पाचपुते यांच्यासाठी ही जागा सोडण्यास सेना अनुकुल आहे. कोणत्याही परिस्थितीत नगरची जागा सेनेला आपल्याकडे हवी आहे. मात्र, लोकसभेची उमेदवारी नाकारताना दिलीप गांधी यांचे पुनर्वसन करण्याचा शब्द दिला गेला होता आणि गांधी यांच्यासाठी नगरची जागा भाजपाल सोडण्याची मागणी आता थेट प्रदेश पातळीवरूनच करण्यात येत आहे. नगर शहरात गांधी- राठोड यांच्यातील वितुष्ठ लपून राहिलेले नाही. लोकसभा निवडणुकीचा निकाल आमच्यामुळे कसा लागला हे शिवसेनेचे पदाधिकारी पटवून देत असताना दुसरीकडे गांधी समर्थक ते मान्य करण्यास तयार नाही. भाजपा आणि मोदींच्या लाटेमुळेच मताधिक्य मिळाले असे भाजपा आणि गांधी समर्थक सांगू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेले मोठे मताधिक्य हे आता भाजपाच्या दाव्याला पाठबळ देणारे ठरत आहे.
उत्तरेत शिर्डीची जागा सेनेच्या कोट्यात होती आणि आहे. आता बदलत्या राजकीय समिकरणांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील भाजपात दाखल होत असल्याने त्यांच्यासाठी सेनेला ही जागा सोडावी लागणार आहे. नेवासा व कोपरगाव या दोन्ही जागा युतीच्या पुर्वीच्या जागा वाटपात सेनेकडे होत्या. मात्र, सध्या या दोन्ही ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे या जागा भाजपाकडेच राहणार आहेत. संगमनेरमध्ये थोरात यांना पराभूत करण्याचा चंग विखे पाटलांनी बांधलाय आणि येथून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील या उमेदवार असणार असल्याचे बोलले जाते. तसे झाले तर संगमनेरमधून भाजपाचा आणखी एक उमेदवार वाढेल. अकोल्यात शिवसेनेपेक्षा भाजपाची आणि विखे पाटलांची मोठी ताकद निर्माण झाली असल्याने ही जागाही भाजपासाठी सोडावी लागणार आहे.
जिल्ह्यात शिवसेनेपेक्षा भाजपाची ताकद वाढत चालली असताना प्राप्त परिस्थितीत शिवसेनेला हमखास निवडून येण्याची शक्यता वाटत असलेली पारनेर ही एकमेव जागा आहे. मात्र, येथेही विरोधक एकसंघ झाले आणि एकास एक उमेदवार दिला तर निकाल काहीही लागू शकतो. लोकसभा निवडणुकीतील मतदानात पारनेर तालुक्यातून विखे पाटलांना अवघ्या १२ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. नगर तालुक्यातील दोन गटांमधून २४ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. विखे पाटलांचा एक गट कायमच औटी यांच्या विरोधात असतो आणि त्याचा विचार करता येथील निकाल काहीही लागू शकतो.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख व अन्य नेते जिल्ह्यात सध्या लक्ष घालून आहेत. शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाबाबत अनेक मतभेद आणि नाराजीचे सुर आहेत. राठोड उपनेते असले तरी त्यांना शहराच्या बाहेर फारसा इंटरेस्ट दिसायला तयार नाही. जिल्ह्यात एकमेव आमदार असलेले विजय औटी पारनेरच्या बाहेर पडायला तयार नाहीत. शिवसैनिकांना जिल्ह्याचा चेहरा आणि त्यांच्या समस्या सोडवू शकेल असा चेहरा मिळालेला नाही हे वास्तव आहे. विधानसभेच्या तयारीला सेना लागली असताना नगर शहराची जागा भाजपाने डोक्यात घेतली आहे. भाजपाचा हा नगरचा खटका वेळीच निघाला नाही तर या खटक्यात नगरची जागा सेना हरल्यास आश्‍चर्य वाटू नये इतकेच!

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!