सारिपाट / शिवाजी शिर्के…… धाक संपलाय : कायद्याचा, खाकीचा की एसपी साहेबांचा

आ. कर्डिलेंची कन्या सुवर्णा कोतकर सापडेना | अनिल राठोड सापडेना | भाग्यश्री मोकाटे सापडेना | शंकरराव गडाख, डॉ. प्रकाश कांकरिया यांच्या घरी कसा जातो पोलिस फौजफाटा?

एसपी साहेब, किती दिवस करणार आहात तुम्ही अभ्यास | जिल्ह्यात चोर्‍या- दरोड्यांचे प्रमाण कमी व्हायला तयार नाही

सारिपाट / शिवाजी शिर्के

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहिली आहे काय, असा थेट सवाल आम्हीच नव्हे तर सामान्य जनता उपस्थित करीत आहे. ज्यांच्याकडे ही संपूर्ण जबाबदारी आहे असे जिल्ह्याचे पोलिस प्रमुख सध्या मुख्यमंत्र्यांच्या ओंजळीने पाणी पित आहेत असेच काहीसे म्हणावे लागेल. जळगावमध्ये नाव कमविलेले हेच ते ईशू सिंधू का, असा सवालच यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. पोलिसांचा कारभारीच जर कोणाच्या तरी ओंजळीने पाणी पिणार असेल तर त्या कारभार्‍याची फौजही तशीच असणार!

केडगावमध्ये शिवसैनिकांचे दुहेरी हत्याकांड घडून एक वर्ष उलटून गेले. त्या गुन्ह्यात भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांची कन्या व भानुदास कोतकर यांच्या सुनबाई सुवर्णा कोतकर या आरोपींच्या यादीत आल्या. खुनाच्या गुन्ह्याचा कट रचण्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आणि त्या दिवसापासून त्या पोलिसांच्या वॉटेंड यादीवर आल्या. आजपर्यंत या सुवर्णाताई पोलिसांना सापडून यायला तयार नाहीत. नव्हे पोलिस त्यांचा शोधच घ्यायला तयार नाही. ज्यांची हत्या झाली त्या शिवसैनिकांना पुण्यतिथीनिमित्ताने कँडल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिवसेनेने यासाठी पुढाकार घेतला. कँडल मार्च काढला म्हणून लागलीच पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले. परंतू आरोपींच्या यादीत वरच्या क्रमांकावर नाव असलेल्या सुवर्णा कोतकर हिला अटक करण्यास पोलिसांना आजही वेळ मिळायला तयार नाही.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने नगर तालुक्यातील पांगरमल येथे दारुकांड झाले. बनावट दारूची विक्री आणि पुढे ती निवडणुकीत वाटली गेल्याचा आरोप झाला आणि त्यातून काहींचा बळी गेला. प्रकरण राज्यभरात गाजले. या प्रकरणात भाग्यश्री मोकाटे या जिल्हा परिषद सदस्याचाही सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले आणि भाग्यश्री मोकाटे आरोपींच्या यादीत आल्या. त्याला आता जवळपास अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला असला तरी भाग्यश्री मोकाटे पोलिस दप्तरी फरारच आहेत. मोकाटे यांचे नाव कर्डिले यांच्या दबावातून टाकले गेले असा आरोप गोविंद मोकाटे हे जाहीरपणे करीत आहेत. राजकारण काहीही असले तरी पोलिस दप्तरी अडीच वर्षे पसार असलेल्या भाग्यश्री मोकाटे पोलिसांना का मिळून येत नाहीत असा थेट सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

महापालिकेत मध्यंतरी आंदोलन झाले आणि त्या आंदोलना दरम्यान जमावाला चिथावणी दिल्याच्या आरोपावरून व बुट फेकण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह काहींवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होताच पोलिसांची कुमक संबंधित आरोपींच्या घराकडे कूच झाली आणि काहींना अटक केली गेली. राठोड यांनी पुणे- मुंबई गाठली. मुख्यमंत्र्यांना ते भेटले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सोडला. राठोड यांनी दरम्यानच्या काळात जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामिन मिळविण्यासाठी अर्ज केला. राठोड यांना जामिन देऊ नये असा स्पष्ट अहवाल पोलिसांनी न्यायालयास दिला. राठोड यांना जामिन दिल्यास ते कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहोचू शकतात असा अहवाल दिला असताना व त्यानुसार न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामिन फेटाळला असताना तेच राठोड आजही पोलिसांना वाकुल्या दाखवत नगर शहरात राजरोस फिरत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या विजयाचा गुलाल घेणारे राठोड जसे सर्वांनी पाहिले तसे तेच राठोड कालच्याला सावेडी कचरा डेपोची पाहणी करताना नगरकरांनी पाहिले. परंतू पोलिसांनी त्यांना पाहिले नाही हे विशेष!

एसपी साहेब, जळगावमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत राज्यमंत्र्याला बेड्या ठोकणारे आणि माजी मंत्री सुरेश जैन यांना कोठडीत टाकणारे तुम्हीच होते ना! मग, नगरमध्ये नक्की काय झालंय! राजकीय दबावातून तुम्ही काम करत असल्याचे आता लपून राहिलेले नाही. याच जिल्ह्यात विश्‍वास नांगरे पाटील, कृष्णप्रकाश यांनी गौरवशाली कारकिर्द गाजवली आणि ते नगरकरांच्या गळ्यातील ताईत झाले. कृष्णप्रकाश यांनी नगरमध्ये लांडे खून प्रकरणात कोतकर- कर्डिले यांची मस्ती जिरवली त्याचवेळी तुम्ही तिकडे ज़ळगावमध्ये सुरेश जैन यांना बेड्या ठोकल्या होत्या! त्यामुळेच तुम्ही नगरमध्ये बदलून आल्याचे वृत्त आले आणि नगरकरांना हायसे वाटले. गुंडप्रवृत्तीच्या विरोधात नगरकर उभा राहिला तो कृष्णप्रकाश यांच्यासारख्या खमक्या अधिकार्‍यामुळे! सिंधू साहेब, आता तुम्ही नगरमध्ये आले असताना तोच नगरकर पुन्हा एकदा या अपप्रवृत्तीच्या विरोधात उभा ठाकण्याचे धाडस करत असताना तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखे बसलात ही बाब सार्‍यांनाच खटकणारी ठरली आहे.

एसपी साहेब, अनेक वर्षांपासून पसार असलेली कर्डिलेंची कन्या सुवर्णा कोतकर तुमच्या यंत्रणेला सापडत नाही. जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोकाटे तुमच्या यंत्रणेला सापडायला तयार नाही. राठोड यांचा अटकपूर्व जामिन फेटाळला असताना व ते नगरमध्ये राजरोस फिरत असताना तेही तुमच्या यंत्रणेला सापडयाल तयार नाहीत. दुसरीकडे जनतेच्या प्रश्‍नावर आंदोलनाच्या दाखल गुन्ह्यात कोर्टातील तारखांना हजर राहिले नाही म्हणून कोर्टाने वॉरंट काढताच तुमचे शंभर-दीडशे पोलिस दरोडेखोराला पकडायला जावे तसे शंकरराव गडाखांच्या बंगल्यात घुसले. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्याशी बोलताना तुमच्या पोलिसांनी जी भाषा वापरली ती सार्‍या जिल्ह्याने पाहिली. आंदोलनासारख्या गुन्ह्यात कोर्टात हजर राहिले नाही म्हणून तुमची यंत्रणा अशी कर्तव्यनिष्ठ दिसली. असेच दुसरे उदाहरण अलीकडेच डॉ. प्रकाश कांकरिया यांच्या रुपाने समोर आले. दोन- तीन वर्षापूर्वी दिलेला धनादेश! तोही कितीचा? लाख- दीड लाखाचा! धनादेशसंबंधिच्या तारखांना ते हजर राहिले नाहीत म्हणून न्यायालयाने त्यांना वॉरंट काढले आणि तुमचे कोतवालकी करणारे कारभारी त्यांच्या घरात घुसले? लागलीच अटक!

एसपी साहेब, साराच विरोधाभास समोर येत आहे. सामान्य माणसाला आता सध्या गुंडमवाल्यांपेक्षा जास्त त्रास होतोय तो पोलिसांचा! जिल्ह्यात वाळू तस्करी थांबली पाहिजे अशी भूमिका तुम्ही घेतली आणि ही तस्करी खरोखरच थांबल्याचे पाहून जनतेने तुम्हाला धन्यवाद दिले. मात्र, गत पंधरा दिवसांपासून हीच तस्करी पुन्हा चालू झालीय! एसपी साहेब, एकदा या तस्करीचा गृहपाठ करा! पोलिस दलातील काही बदमाश कर्मचार्‍यांचीच वाहने या वाळू तस्करीत आहेत. काही कर्मचारीच वाळू तस्करीत गुंतलेत! काहींनी नातवाईक, मित्रांच्या नावावर वाळू तस्करीची वाहने चालविली आहेत. अनेक पोलिस गुंडमवाल्यांचे मित्र झाले आहेत. अडवा येणार्‍याला कायमचा आडवा करण्याच्या सुपार्‍या दुसरेतिसरे कोणीच नाही तर तुमचेच पोलिस देत असल्याची चर्चा आता जाहीरपणे होऊ लागली आहे. सामान्य व्यक्ती पोलिस ठाण्याच्या दारात आला तर त्याला गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात आहे आणि चोर-मवाली- दरोडेखोराला जावयासारखी!

एसपी साहेब, तुम्ही जिल्ह्याचा गृहपाठ करीत आहात असा काहीसा भ्रम जनतेचा झालाय! पण, आता हा गृहपाठ संपला असावा! परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधी हातात दंडुके घेण्याची गरज आहे. कोणाच्या ओंजळीने पाणी पिणार्‍यांपैकी मी नाही हे आता कृतीतून दाखवून दिले पाहिजे! नसता…..!

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!