सारिपाट / शिवाजी शिर्के….. चिंता: जनतेला दुष्काळाची अन् बावनकुळेंना ‘ड्राय डे’ची!

बा... देवेंद्रा अजब तुझे सरकार! अण्णा, बावनकुळे हे तर तुमच्या गळ्यातील ताईत!

मुक्या जनावरांसह, अबालवृद्धांचे डोळे आकाशाकडे; चंद्रशेखर बावनकुळेंचे लक्ष ‘पेताडांकडे’!

सारिपाट / शिवाजी शिर्के

उभ्या राज्यात दुष्काळ पडलाय आणि सामान्य जनताच नव्हे तर मुकी जनावरं देखील हतबल झालीत. भयानक परिस्थिती निर्माण झाली असताना राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातील विविध सामाजिक भान असणार्‍या संघटना दुष्काळावर मात करणार्‍या उपाययोजना राबविण्यासाठी सरसावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या दुष्काळी परिस्थितीत गंभीर असल्याच दिसत असले तरी त्यांच्या सहकार्‍यांना वेगळीच चिंता पडल्याचे दिसते. राज्यात दारुबंदी करण्याच्या विचारात सरकार असल्याचे मध्यंतरी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.मात्र, त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील चंद्रशेखर बावनकुळे या मंत्र्यांना चिंता पडलीय ती ‘पेताड’ वाढविण्याची! राज्यात दारु विक्री बंद करण्यासाठी सध्या असणार्‍या ‘ड्राय डे’ची संख्या कमी करण्याची नामी शक्कल आता त्यांनी पुढे आणली आहे. दारुबंदीसाठी सरसावलेल्या अण्णांच्या ‘गुडबुक’मध्ये राज्यातील जे तीन-चार मंत्री आहेत त्यात चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव! मग, अण्णा आता तुम्हीच सांगा तुमच्या गुडबुक मध्ये असे कसे हो मंत्री!

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्याचे सत्ताधारी आता पुढच्या तीन महिन्यात घोषणांचा पाऊस पाडताना दिसतील. त्याचा प्रारंभ एव्हाना झाला आहेच. मात्र, राज्य दुष्काळाच्या प्रचंड विदारक परिस्थितीतून जात असताना काही मंत्र्यांना आपण नक्की काय घोषणा करतोय याचे भानच राहिलेले दिसत नाही. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसांपूर्वी नागपुरात म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात होते. त्यांची ती भेट कशासाठी होती यापेक्षा त्यांनी नागपुर मुक्कामात विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी त्यांच्या …. तारे तोडले. पत्रकारांशी बोलताना बावनकुळे काय म्हणाले? बावनकुळे म्हणाले. ‘ ज्या दिवशी दारुबंदी असते त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर दारुची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. सध्या राज्यात सणानुसार ड्राय डे जाहीर करण्यात येतो. सध्या जिल्ह्यापुरता ड्राय डे घोषित करण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना आहेत. ड्राय डे धोरणासंदर्भात सुस्पष्टता आणि सुसुत्रता आणली जाणार आहे. राज्यात धार्मिक सण, उत्सव, थोर पुरुषांच्या जयंती दिवशी दारु विक्रीवर बंदी असते. राज्यातील दारुबंदी दिवसांची (ड्राय डे) ची संख्या कमी होणार असून यासाठी राज्य सरकारने एक समिती नियुक्त केली आहे. ही समिती त्याचा अभ्यास करुन अहवाल तयार करेल’.

बावनकुळे हे उत्पादनच्या जोडीने उर्जा खात्याचेही मंत्री! राज्यातील चार- पाच मंत्री हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या गुडबुकमध्ये आहेत. त्यात बावनकुळेंचा समावेश असल्याची चर्चा आहे. खरेखोटे अण्णांनाच माहिती! परंतू राज्यासमोर संकट काय आले आहे आणि त्यासाठी आपण काय केले पाहिजे यापेक्षा काहीतरी वेगळे करून दाखविण्याच्या फंदात बावनकुळेंना आता चिंता पडलीय ती राज्यातील ड्राय डे कमी करण्याची! बर ही चिंता व्यक्त करताना त्यांना असे दिसून आले आहे की, ड्राय डेच्या दिवशी अथवा त्याच्या आदल्या दिवशी छुप्या मार्गाने दारूची विक्री होते. छुप्या मार्गाने दारूची विक्री होत असली तरी ती त्या दुकाने- हॉटेलांमधूनच होते. हे व्यावसायिक या अनुषंगाने विक्रीनुसार कर सरकारला देतात! वास्तविक राज्य व्यसनमुक्त कसे होईल यावर उपाययोजना करण्याचे सोडून राज्यातील जनता दारूडी कशी होईल याचीच काळजी बावनकुळेंना पडलेली दिसतीय.

गुजरात राज्यात संपूर्ण दारुबंदीचा फंडा वीस-पंचवीस वर्षापूर्वी पुढे आला आणि त्याच्याआधी तिथल्या लोकांना दारू ढोसण्यासाठी सरकारी परवाना दिला जायचा. त्या परवान्यावर परवानाधारकाचे नाव या वाक्याऐवजी ‘बेवडा नू नाम’, असे वाक्य असायचे! मद्य प्राशन करण्यासाठीचा परवाना घेणार्‍या इसमाला असा अर्ज भरतानाच आपण अर्जदार नसून आपण ‘बेवडे’ आहोत याची जाणिव व्हायची आणि तो पुढ असा अर्ज अर्धवट तरी सोडायचा किंवा परवान्याचा फारसा बोभाटा तरी करीत नसयचा! त्यातून पुढे असा निष्कर्ष निघाला की गुजरात राज्यात बेवड्यांची संख्या कमी झाली.

बावनकुळे ज्या सरकारमध्ये मंत्री आहेत, ते राज्य सरकार संपर्णूत: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असले तरी ते निवडून आलेय मोदी लाटेवर! आता पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न हे सरकार पाहत असले तरी त्यात मोलाचा वाटा असेल तर पंतप्रधान मोदींचाच! मग, आता बावनकुळेंनी ड्राय डे कमी करण्यापेक्षा अनेकांच्या संसाराची राखरांगोळी करणार्‍या दारूला हद्दपार करण्यासाठी काहीतरी वेगळा फंडा वापरण्याची गरज आहे. मग भलेही त्यासाठी मोदींच्या गुजरातमधील ‘बेवडा नू नाम’ सारखे छोटे परंतू परिणामकारक फंडे वापरावेत!

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्या काही प्रमाणात पुर्ण झाल्या असल्या तरी प्राप्त परिस्थितीत जनतेसह सामाजिक संघटना दुष्काळमुक्तीसाठी सरसावल्या असताना सरकारच्या प्रतिनिधींना ‘भानावर’ आणण्याची भानामती देवेंद्र फडणवीस यांना वापरावी लागणार आहे. तसे झाले तरच सरकारच्या प्रती जनतेच्या भावना बदलतील नसता कितीही मोठी लाट आली तरी त्याचा काहीही फायदा देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाला होणार नाही इतकेच!

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!