सारिपाट / शिवाजी शिर्के…. रस्त्यावर चारा टाकणार्‍यांच्या ‘लवण्या’ आधी हाणा!

रस्त्यावरच्या जनावरांमुळे दररोज होताहेत अपघात | मुक्या प्राण्यावरचे असले नाटकी प्रेम कशासाठी? | आयुक्तसाहेब; मोकाट नव्हे, ही तर पाळीव जनावरे!

सारिपाट / शिवाजी शिर्के

रस्त्याच्या मधोमध जनावर बसले नाही असा एकही रस्ता दिसून येत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत या जनावरांचा डांबरावर ठिय्या! तरीही त्यांची तब्बेत मजबूत! डांबर खाऊन ही जनावरे तब्बेतशिर नक्कीच होत नाहीत! त्यांची तब्बेत बनते ती काही नौटंकीबाज प्राणीमित्रांमुळे! कोठूनतरी घास अथवा गवताची पेंढी विकत घ्यायची! रस्त्याच्या मधोमध ठिय्या देऊन बसलेल्या अथवा उभ्या असलेल्या मोकाट जनावराला ही गवताची पेंढी टाकायची! खूप मानवतावादी, प्राण्यांवर दया दाखविणारा असल्याची नौटंकीबाज चमकोगिरी करणार्‍यांमुळे ही जनावरे तासनतास रस्त्याच्या मधोमध ठिय्या देऊन बसतात. घरी आईबापांना जीव लावायचे सोडून मुक्या जनावरांवर असले चमकोगिरीचे प्रेम दाखविताना पादचारी, वाहनचालकांच्या अपघातास आपले हे ‘दातृत्व’ कारणीभूत ठरते याची त्यांना जाणिव असते. तरीही त्यांचा दिनक्रम चालूच असतो. म्हणूनच आयुक्तसाहेब जनावरांवर आणि जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याआधी या मोकाट जनावरांना चारा टाकणार्‍यांच्या ‘लवण्या’ हाणण्याचे काम आधी हाती घ्या!

नगर शहरातील एकही रस्ता असा नाही की त्या रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या नाही! बरं ही जनावरे मोकाट नसतात! या जनावरांना मालक असतो. हा मालक सकाळी दुधाची धार काढली की लागलीच या जनावरांना रस्त्यावर सोडून देतो. सकाळीच ही जनावरे ठरलेल्या ठिकाणी येऊन उभी राहतात किंवा बसतात! कितीही मोठे वाहन आले अथवा हॉर्नचा कितीही मोठा आवाज केला तरी ही जनावरे जागची हलत नाहीत. या जनावरांच्या मालकांना याचे कोणतेही सोयरसुतक नसते. ता बाजूला उभे राहून अथवा अधूनमधून या जनावरांवर नजर ठेऊन असतो. जनावरे पोटात गेलेल्या अथवा पुढ्यात पडलेल्या गवताचा, घासाच्या पेंढीचा रवंत करत बसलेली असतात. संध्याकाळ झाली की या जनावरांचा मालक त्यांना बरोबर त्याच्या घरी, दावणीला घेऊन जातो.

रस्त्यावरच्या या ठिय्या देऊन बसलेल्या जनावरांमुळे वाहतुकीस होणारा अडथळा ही नित्याची बाब झाली आहे. गोठेधारक, तबेलेधारकांची जनावरे त्यांच्या गोठ्यांमध्ये असली तरी अनेकांची रस्त्यावरच असतात! म्हशींचे कळप ही तर मोठीच समस्या! त्यातही मोठ्या शिंगाच्या म्हशी आणि त्यांचे उंदडणे अनेकांच्या जीवावर बेतलेले आहे. अनेक दुचाकीस्वारांना या म्हशींच्या शिंगाचा प्रसाद मिळाला असून अनेक चारचाकी वाहनांच्या काचांना तडाखा बसलेला आहे. या म्हशींच्या पाठीमागे चालणार्‍या राखणदाराच्या हातात भला मोठा लाकडी दांडा! त्याचा अवतार आणि तो दांडा पाहूनच कोणी तक्रारीच्या भानगडीत पडत नाही. कोणी असा जाब विचारण्याच्या भागनडीत पडलाच तर त्याची गय नाही! या कळपांना कोण आणि कसा आवर घालणार या प्रश्‍नाचे उत्तर आता नगरकरांना महापालिका आयुक्तांनीच देण्याची गरज आहे.

दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम या सणांची काळजी महापालिका प्रशासनाला पडली आणि त्यांच्याकडून या मोकाट जनावरांना आणि त्यांच्या मालकांना तंबी देण्यात आलीय. या कालावधीत ही मोकाट जनावरे रस्त्यावर येणार नाही याची दक्षता घेण्याचे आणि तसे झाले नाही तर कायदेशिर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. मुळात इशारा देण्याची गरज नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे ही जनावरे वर्षातील ३६५ दिवस रस्त्यावरच ठाण मांडून असतात! आयुक्तांना ही बाब नक्कीच माहिती आहे. मग, सण- उत्सवांचा मुहूर्त पाहून इशारा देण्याचे प्रयोजन काय? वर्षभरात अशा मोकाट जनावरांच्या विरोधात कितीवेळा व्यापक मोहिम राबवली आणि किती जनावरे व किती मालकांवर कारवाई केली याचे उत्तर नगरकरांना अपेक्षीत आहे. इशारे देऊन कागदी घोडे नाचविण्यात काहीच अर्थ नाही.

आयुक्त साहेब, महापालिका प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी काढलेेले पत्रक आणि त्यात कायदेशिर कारवाईबाबत दिलेला इशाराच मुळात हास्यास्पद आहे. मोकाट जनावरे आणि मोकाट कुत्रे यांच्यामुळे नागरिकांना व वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता या पत्रकात व्यक्त केली आहे. याशिवाय या मोकाट जनावरे व कुत्र्यांपासून इजा होण्याचा धोका संभवतो, असेही या पत्रकात म्हटले आहे. नगर शहरात मोकाट कुत्र्यांनी मध्यंतरी अनेकांना चावे घेतले. त्यातून आंदोलने झाली तरीही महापालिकेला ‘इजा होण्याचा संभव’ कसा वाटतो हेच कळेनासे झाले आहे.

आयुक्त साहेब, मोकाट जनावरांचा बंदोबस्त नक्की करा! पण, त्या आधी या मोकाट जनावरांना रस्त्यावर गवताच्या, घासाच्या पेंढ्या टाकणार्‍यांच्या लवण्या आधी हाणा! जनावरांवर असले नाटकी प्रेम करणार्‍यांमुळेच ही जनावरे रस्त्यावर ठिय्या देऊन बसलेली असतात हे वास्तव आहे. घासाच्या, गवताच्या पेंढ्या विकणारेही रस्त्यावरच पथारी मांडून बसलेले असतात. त्यांच्यावरही कारवाई होण्याची गरज आहे. रस्त्यावरच्या जनावरांना गवताच्या, घासाच्या पेंढ्या टाकणार्‍यांपैकी अनेकजण घरातील आई- वडिलांना नीट सांभाळत नाहीत हेही वास्तव आहे. मुक्या प्राण्यावर नक्की प्रेम केले पाहिजे, त्यांना खायला चाराही नक्कीच दिला पाहिजे! पण हे करताना आपल्या असल्या दानशूर कृतीमुळे कोणाचा जीव जाणार नाही, कोणाला दुखापत होणार नाही आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याचे साधे भान तरी जपले पाहिजे. चारा द्यायचाच असेल तर रस्त्याच्या बाजूला वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही अशा ठिकाणी टाकला तर हीच जनावरे आपसूकपणे त्याठिकाणी जातील व चारा खात बसतील. पण, दातृत्वाची नौटंकी करणार्‍यांना रस्त्याच्या मधोमध बसलेल्या जनावरांना चार्‍याचे दान करीत असल्याचे दाखविण्यात मोठी हौस! त्या हौसेतून अनेकांना त्रास होतोय यापेक्षा मी जनावरांवर कसे प्रेम करतो हे दाखविण्यात यातील अनेकांना मोठेपणा मिरवावा लागतो. त्यामुळे आयुक्त आणि त्यांचे पालिका प्रशासन या विषयावर जर खरेच गंभीर असेल तर त्यांनी मोकाट जनावरे आणि त्यांच्या मालकांवर कारवाई करण्याआधी या जनावरांना रस्त्यावर चारा देणार्‍यांच्या लवण्या आधी हाणाव्यात आणि त्यासाठी ओले फोक तयार ठेवावेत! असे झाले तर आणि तरच ही रस्त्यावरची जनावरे आपोआप गायब होतील!

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!