पूजाच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा

चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठानच्यावतीने महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना निवेदन

अहमदनगर । नगर सह्याद्री

विजेचा शॉक लागून मृत्यूमुखी पडलेल्या कु.पुजा कुर्‍हे हीचा मृत्यूस जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन भाजपा व चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठानच्यावतीने महावितरणचे अधिक्षक अभियंता यांना देण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर बोचूघोळ, दत्ता गाडळकर, अभय बडे, राजेंद्र सातपुते, चंद्रकांत जाधव, अ‍ॅड. अमोल थोरात, अ‍ॅड.दिपक वात्रे, विजय डके आदि उपस्थित होते.

वीज वितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर पोलिस मुख्यालयातील वसाहतीत राहणाऱ्या पोलिसाची मुलगी कु.पूजा सुनिल कुर्हे या मुलीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालेला आहे.

पावसामुळे घरावरील पत्रे व भिंतीला करंट उतरला होता, चार दिवसांपूर्वी एमएसईबी यांच्याकडे तशा प्रकारची पूर्व कल्पना व तक्रार करण्यात आलेली होती, मात्र त्या तक्रारीची कुठलीही दखल घेतली गेली नाही व संबंधीत वीज वाहक तारांची उपाय योजना केली गेली नाही व या हलगर्जीपणामुळे वीज वाहक तारांतून घराच्या भिंती व पत्रे यामध्ये करंट उतरुन मुलगी पूजा हिचा मृत्यू झालेला आहे.

सदरची बाब अतिशय गंभीर असून असा प्रकार वारंवार घडत आहेत व वारंवार वीजेचा झटका लागून अनेकांना मृत्यू ओढावत आहे हा प्रकार थांबावा या हेतूने योग्य ते पाऊल उचलणे आवश्यक आहे.

विजेचा शॉक लागून मुलगी कु.पूजा सुनिल कुर्‍हे हिच्या झालेल्या मृत्यूस जबाबदार अधिकार्‍यांवर त्वरीत कायदेशीर कार्यवाही करावी, अन्यथा आम्ही भाजपा व चंद्रशेखर आजाद युवा प्रतिष्ठान, चौपाटी कारंजा, अ.नगर यांच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागेल. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास न्यायालयात दाद मागावी लागेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!