पाण्यासाठीचा आमचा संघर्ष संपणार कधी?- पंचायत समिती सभापती राहुल झावरे

पंचायत समिती सभापती राहुल झावरे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने ‘नगर सह्याद्री’शी संवाद | वळवळीला नव्हे, चळवळीला जनतेने डोक्यावर घेतले!

थेट संवाद / शिवाजी शिर्के

पारनेरचा पाणीप्रश्‍न कधी सुटणार या एकमेव प्रश्‍नाने माझ्यासारख्या अनेक ध्येयवेड्या तरुणांना आजही चिंता पडली आहे. पाण्यासाठीचा आणि विशेषत: पारनेरच्या हक्काचे पाणी पुणेकर पळवित असताना नंदकुमार झावरे साहेबांनी सातत्याने आवाज उठविला. आजही हा विषय कायम आहे. तालुक्यात आजही जर सव्वाशेपेक्षा जास्त टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात असेल तर ही बाब निश्‍चितपणे कोणत्याच पुढारपण करणारांना शोभणारी नाही. पारनेर तालुक्याचे नेतृत्व कधीच सत्तासम्राटांचे नव्हते व नाही. तालुका अशा सम्राटांना कधीच बळी पडणार नाही. हीच आपल्या तालुक्याची वेगळी ओळख आहे. आपला तालुका बुद्धीवंतांचा तालुका असून त्याला चळवळीचा वारसा कळतो आणि वळवळीचाही वारसा कळतो. आतापर्यंतच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालांवर नजर टाकली तर या तालुक्यातील जनतेने वळवळीला नव्हे तर चळवळीला डोक्यावर घेतल्याचे दिसून येते. ते अनेकदा सिद्धही झाले आहे. पंचायत समितीचे सभापती राहुल नंदकुमार झावरे हे त्यांची भूमिका परखडपणे मांडत होते आणि निमित्त होते त्यांच्या वाढदिवसाचे!

पंचायत समितीचा सभापती म्हणून तालुक्यात उत्कृष्ट काम केले असल्याचे स्पष्ट करतानाच रोजगार हमीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ४० टक्के काम एकट्या पारनेर तालुक्यात केले आहे. सहा लाख मनुष्यदिन (मॅन डेज) काम केले. त्यातून रोजगाराची निर्मिती होतानाच मागील दुष्क़ाळात १० कोटीपेक्षा जास्त रक्कम यावर खर्ची पडली. हे दहा कोटी ठेकेदाराला, जेसीबी वाल्याला गेलेले नाही. हाताला काम ज्याला पाहिजे होते त्याला हे दहा कोटी गेले याचे समाधान असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

शिक्षण क्षेत्रातील पारनेरचे योगदान मोठे आहे. तालुक्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्‍न मार्गी लावले. मोठे काम केले. झिरो पेंडन्सी असणारी पंचायत समिती ही जिल्ह्यातील एकमेव पंचायत समिती ठरली. शिक्षक पंचायत समितीमध्ये न थांबता शाळेत थांबला पाहिजे ही भूमिका यशस्वी ठरली. पंचायत समिती पातळीवर शिक्षकांचा एकही कागद शिल्लक नाही. यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना वेळ देता आला हे मला समाधान आहे.

पंचायत समितीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीचा सभापती झाले. त्यांच्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते व सदस्य पंचायत समितीत यायचे. मात्र, मी माझ्या कालावधीत पंचायत समितीत सर्वच पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी आल्याचे पाहिले. प्रत्येकाला पत्र दिले आणि शिफारशी दिल्या, ज्या पक्षाची सत्ता नाही, त्या पक्षाचे नेते- कार्यकर्तेही उत्साहाने पंचायत समितीत आले आणि त्यांची कामे झाली हे माझ्या शिपायाकडून मला सांगितले गेले आणि तीच माझ्या कामाची पावती मी समजत असल्याचे श्री. झावरे म्हणाले.

माझ्या आधी तालुक्यातील सामान्य लोक हे तहसील, पोलिस ठाण्यात आणि जास्तीत जास्त बाजारात यायचे. मात्र, माझ्या कालावधीत लोकांना पंचायत समिती दिसू लागली. त्यांचा येथील राबता वाढत गेला. त्यांची कामे मार्गी लागत गेली. कारण, मी पंचायत समितीत सातत्याने उपलब्ध होत गेलो. पंचायत समितीत तरुण सहकारी, त्यामुळे काम करण्याची उर्जा मिळत गेली. पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून काम करण्याची माझी भूमिका सातत्याने राहिली. त्यामुळे विकासात्मक बाबीवर एकमत व्हायला कोणतेही मतभेद झाले नाही याचाही राहुल झावरे यांनी आवर्जुन उल्लेख केला.

 

आता तरी पठार भागाचा एक टीएमसी पाणी प्रश्‍न सुटेल का?
खरे तर तालुक्याच्या दृष्टीने विचार केला तर तालुक्याकडे आज राज्याच्या विधानसभेचे मोठे पद आहे. तालुक्यावर प्रेम करणारा कुटुंबातील व बाळासाहेब विखे पाटलांच्या घरातील आमचा नेता आज खासदार आहे. आमचे नेते व ज्यांच्याकडे आम्ही सातत्याने राज्याचे नेते म्हणून पाहत आलो ते आज राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे जनतेच्या आणि तालुकावासीयांच्या अपेक्षा जाग्या होणे स्वाभाविक आहे आणि झालेही तसेच. त्यामुळे आता अनेक वर्षांपासून तालुक्याच्या पठार भागाची मागणी असणारा एक टीएमसी पाण्याचा प्रश्‍न निकाली निघू शकतो. पठार भागाला या तीनही शक्तींच्या माध्यमातून पाणी मिळण्याची हीच योग्य वेळ आहे असे मला वाटते.

संकुचित विचारसरणीला थारा न देण्याचे संस्कार
पक्षीय दृष्टीकोणातून काम करण्याची शिकवण मला कधीच दिली गेली नाही, त्यातूनच सभापती पदी यशस्वीपणे काम करता आले. पंचायत समितीत मी असतानाही आणि नसतानाही प्रत्येकाला चहा दिला गेला. त्यातून अनेकांना आश्‍चर्यही वाटले. पण, मी त्याकडे दुर्लक्ष केले. चहाचे हे बील मी स्वत: माझ्या खिशातून आजही भरत आलो. संकुचित विचारसरणीतून काम करायचे नाही याची शिकवण मला बाळासाहेब विखे पाटील आणि नंदकुमार झावरे साहेब यांनी दिली आणि ती मी आचरणात आणली इतकेच!

होय मी वारसा जपतोय!
पारनेर तालुक्यात मागील चाळीस- पन्नास वर्षात त्या-त्यावेळी पुढाकारपण करणार्‍यांनी विकासासाठी योगदान दिले. आज जो काही तालुका पुढे आलेला दिसतोय त्यात अनेक ज्येष्ठांचे योगदान राहिले. त्यांच्यामुळेच तालुक्यात काळू धरण, सुपा एमआयडीसी, विविध धरणांची कामे झाली आणि त्यांच्या मुलांबद्दल आज चुकीच्या पद्धतीने बोलले जात असेल तर ते वाईट. आमचे वडिल आमदार असताना अनेकदा एसटीने मुंबईला जायचे. मी स्वत: सायकलने कॉलेज केले आहे. सामान्य जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी रात्रंदिवस संघर्ष करण्याची परंपरा आमच्या घरात आहे आणि तीच परंपरा वारसाहक्काने मी चालवतोय इतकेच!

विश्‍वसार्हतेच्या कसोटीवर टिकण्याचे काम करतोय!
राजकारणात समाजाची विश्‍वासर्हता टिकवून ठेवणे हीच खरी परिक्षा असते. अनेकदा अशी राजकीय कोडी तयार होतात आणि आपल्या समोर पर्याय उपलब्ध व्हायला लागतात. त्यावेळी जनतेच्या हिताचा निर्णय जो घेऊ शकतो तोच विश्‍वासार्हतेच्या कसोटीवर उतरत आला आहे. झावरे साहेबांनी तेच केले. त्यामुळेच सक्रिय राजकारणापासून गेली वीस वर्षे लांब असतानाही त्यांच्या तोंडून काय आदेश येतो याकडे तालुक्यातील जनता कान लावून बसलेली असते. हा विश्‍वास फक्त आणि फक्त झावरे साहेबांनीच दिला असून तोच वसा आणि वारसा मी चालवतोय!

तालुक्याचा पाणी प्रश्‍न कोणी गांभीर्याने समजून घेणार आहे का?
तालुक्याचा उद्याचा नेता कोण होईल हा गंभीर प्रश्‍न नाहीच. गंभीर प्रश्‍न हा आहे की आजही तालुक्यात १२५ टँकरने पाण्याच्या खेपा चालू आहेत. आजही तालुक्याला टँकरने पाणी द्यावे लागते हा प्रश्‍न गांभिर्याने समजून घेणारा कोण? त्याची सोडवणूक करण्याची धमक कोणात आहे? तालुक्याचे हक्काचे पाणी आपण आजही मिळू शकलो नाही. हे पाणी आपण मिळू शकतो की नाही हे जास्त महत्वाचे. आज पारनेर तालुक्याच्या दृष्टीने अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे की सर्वसामान्य माणसाच्या हक्काच्या पाण्यासंदर्भात पुन्हा उमेद जागी झालेली दिसत आहे.

पारनेरच्या पाण्याबाबत बैठका का नाही?
कुकडीसह तालुक्याचे हक्काचे पाणी पारनेरला मिळावे यासाठी नंदकुमार झावरे यांच्यानंतर कोणी अधिकारवाणीने मांडले का असा सवाल उपस्थित करतानाच कर्जत- श्रीगोंद्याच्या पाण्यासाठी आणि नगर तालुक्याला पाणी मिळावे यासाठी तातडीने मुंबईत बैठका होतात. मग, पारनेरसाठी अशी बैठक झाली का? या विषयावर कोणीच का बोलायला तयार नाही.

मर्जीतील नेतृत्वाचे रोपण करता येणार नाही!
आताच्या खासदाराकीची निवडणूक तुम्ही पहा. नेतृत्वाने त्यांच्या मर्जीतील नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला. मात्र, जनतेने ते होऊ दिले नाही. हेच दक्षिणेच्या आणि पर्यायाने पारनेरच्या राजकारणाचे वेगळे पण आहे. त्यामुळे नेतृत्व लादून तयार होत नसते, ते गर्भातून जन्माला यावे लागते हेच खरे. जनतेच्या मनात ते असावे लागते. त्याच्या प्रती विश्‍वास निर्माण व्हावा लागतो. त्याचा तालुक्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण हा पालकत्वाचा असावा लागतो. त्यामुळे नेतृत्व हे सर्वसामान्यातूनच उठणार यावर माझा विश्‍वास आहे. नेतृत्वाचे रोपण करता येणार नाही.

आदिवासींचा मुद्दा आणि त्यांची कामे हा मुद्दा का?
झावरे साहेब आमदार असताना त्यांनी सातत्याने आदिवासी बांधवांना न्याय देण्याची भूमिका घेतली. त्यातूनच त्यांचा ढवळपुरीसह परिसरातील आदिवासी, धनगर बांधवांशी थेट संपर्क राहिला. मी राजकारणात सक्रिय झाल्यानंतर साहेबांवर प्रेम करणारी ही सर्व मंडळी आपसूकपणे माझ्या संपर्कात आली. बरं, या मंडळींच्या चेहर्‍यावर आनंद दिसावा आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी झावरे साहेबांनी केलेला संघर्ष आणि प्रयत्न मी लहानपणापासून पाहत आलो आहे. त्यामुळेच मी सातत्याने तालुक्यातील विविध गावांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करत असताना ढवळपुरीसह आदिवासी भागातील जनतेचे प्रश्‍न प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच सलग ३५ वर्षे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणारी ढवळपुरी आमच्या ताब्यात आहे. आज या गावात उच्चशिक्षित डॉक्टर आमचा सरपंच आहे.

वाड्यावरचं, पाटीलकींचं राजकारण कधीच जमले नाही
शाहू, फुले, आंबेडकर असेच शब्द लहानपणापासून माझ्या कानावर पडत आले. झावरे साहेबांनीही सातत्याने बारा बलुतेदारांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि त्यांच्यावर प्रेम केले. नोकरीच्या निमित्ताने संधी देण्याची ज्या-ज्यावेळी वेळ आली त्या-त्यावेळी साहेबांनी तालुक्यातील बारा बलुतेदारांना न्याय दिला. प्राप्त राजकीय परिस्थितीची समिक्षा केली तर तालुक्यातच नव्हे तर राज्यातील पाटीलकीचे राजकारण याच बारा बलुतेदारांनी संपुष्टात आणल्याचे दिसून येते. ही बाब मलाच नव्हे तर कोणालाही गांभिर्याने घ्यावी लागणार आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!