दुष्काळ संदर्भातील सर्व बाबींवर योग्य उपाययोजना करण्याची मागणी

अहमदनगर – जिल्ह्यात उन्हाची तीव्रता व दुष्काळाची भीषणता दिवसंदिवस वाढत असून, पाणी व चार्‍या अभावी शेतकर्‍यांपुढे पशुधन वाचविण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. यासाठी जनावरांच्या छावण्या आधार ठरत असून, छावण्या मंजुरीकरिता शासनाने तब्बल 48 अटींची पुर्तता करण्याची अट शिथिल करावी, स्थानिक अधिकार्‍यांना परिस्थितीनुसार अटी, शर्ती आंशिक बदल करण्यास परवानगी द्यावी, छावणी चालकांना जनावरे सांभाळण्यासाठी मोठा खर्च करावा लागत असल्याने अनुदानात वाढ करावी तसेच मागील बीले तातडीने अदा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांना देण्यात आले. यावेळी आ.संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, किसनराव लोटके, संजय कोळगे, शारदाताई लगड, अरिफ पटेल, संजय सपकाळ, फारूक रंगरेज आदि उपस्थित होते.
जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून, अनेक ठिकाणी मागणी करुन सुध्दा छावण्या दिल्या जात नाही.छावणी मंजुरीकरिता तब्बल 48 अटी राज्य शासनाने लागू केल्या आहेत. यामध्ये राज्य शासनाने तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक छावणीमध्ये जनावराची कमाल मर्यादा 500 आहे. ही अट शिथिल करून स्थानिक अधिकार्‍यांना परिस्थितीनुसार आंशिक बदल करण्यास शासनाने तातडीने मान्यता द्यावी. प्रत्येक जनावर मालकास एकूण केवळ 5 जनावरे छावणीत दाखल करता येतील ही अट ताबडतोब रद्द करण्यात यावी. छावणीत मोठ्या जनावरांना आणि लहान जनावरांना प्रत्येकी 3 किलो व 1.5 किलो आठवड्याचा पेन्ट देण्यात येतो. परंतु गायी, म्हशीकरिता ते पशुखाद्य अपुरे असल्याने याचा दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. तरी मोठ्या जनावरास व लहान जनावरास प्रतिदिन 1 किलो व अर्धा किलो अशी वाढ करण्यात यावी. छावणी चालकांना प्रति जनावर 90 रुपये अनुदान देण्यात येते. परंतु शेड उभारणी, प्रकाश योजना, पाणीपुरवठा, चारा मुरघास या सर्व बाबींवर मोठा खर्च करावा लागत असल्याने अनुदानात वाढ करावी. अन्यथा स्वतंत्र अनुदानाची व्यवस्था करावी. तसेच मागील बिल तातडीने अदा करुन, दुष्काळ संदर्भातील सर्व बाबींवर योग्य उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!