मोरया रे…! / शिवाजी शिर्के….. नातूच, विखेंचा काय अन् पवारांचा काय?

मोरया रे…! / शिवाजी शिर्के

सालकरी सालकरीच राहिला आणि त्याचा मुलगा देखील सालकरीच राहणार त्यामुळे सालकर्‍याला (राम शिंदे) निवडून द्यायचं की मालकाला (रोहित पवार) असा थेट सवाल पालकमंत्री राम शिंदे यांनी केल्यानंतर बाप्पा गणेशानं त्यावर काल भाष्य केलं. खरे तर बाप्पानं हा विषय का छेडला असावा यावर विचार करत असतानाच बाप्पा माझ्या पुढ्यात आला! त्याच्या हातात वर्तमानपत्र पाहून मला धक्काच बसला!

मी- बाप्पा, कुठलं वर्तमानपत्र हातात घेऊन आलास!

श्रीगणेशा- ‘सामना’!

मी- शिवसेनेच्या विचारांचं दैनिक आहे असं तूच म्हणाला होतास ना!

श्रीगणेशा- होय, शिवसेनेचं मुखपत्रच आहे ते! अरे भक्ता, पण आज हे दैनिक मी मुद्दामहून आणलं आहे. त्यातील अग्रलेख वाच!

मी- बाप्पा, तूच सांग ना काय आहे त्यात!

श्रीगणेशा- नव्या पवारांचा राज्यात उदय होत आहे, असं त्यात म्हटलं आहे.

मी- समजलं नाही!

श्रीगणेशा- अरे भक्ता…! शरद पवार, अजित पवार यांच्यानंतर पार्थ पवार राजकारणात उतरणार असं बोललं जात असताना पार्थ पवार यांना पराभवास सामोरे जावे लागले. त्यानंतर पवारांच्या घरातील चौथे पवार म्हणजेच रोहीत पवार राजकारणात येत आहेत. या चौथ्या पवारांचं कौतुक करताना ‘सामना’ मधून ठाकरे यांनी थेट अमित शाह व देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधलाय! रोहित पवार यांचं तोंडभरुन कौतुक करताना ठाकरे यांनी थेट अमित शाह यांच्यावरच निशाणा साधलाय! हे कौतुक करताना अमित शाह यांच्या ‘पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?’, या प्रश्‍नाला रोहित पवार यांनी दिलेल्या उत्तरातील प्रश्‍न दुर्लक्षीत करता येणार नसल्याचा आवर्जुन उल्लेख ‘सामना’मधून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष लवकरच संपेल आणि या पक्षात फक्त शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे राहतील असं भाकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं होतं. पण, रोहित पवार यांनी भाजपाच्या आरोपांना उत्तर दिले असून पवार यांचे प्रश्‍न रास्तच असल्याचं समर्थन ठाकरे यांनी ‘सामना’मध्ये केलंय!

मी- बाप्पा, नक्की काय चाललंय! येणार्‍या निवडणुकीत सेना- भाजपा युती होणार असं ठाकरेही म्हणतात अन् फडणवीसही! अन् दुसरीकडे ‘सामना’मधून मोदी- शाह यांच्यासह फडणवीस यांनाही टार्गेट केलं जात आहे. या चौथ्या (रोहित) पवारांबद्दल ठाकरे यांना असा कसा अचानक कळवळा आला!

श्रीगणेशा- अरे भक्ता…. हा तर ट्रेलर समज! निवडणूक जससशी जवळ येईल तसंतसं हे आणखी दिसेल! तिकडं तुझ्या कर्जत-जामखेडमध्ये सालकर्‍याच्या पोराला घेरण्याचं काम चालू आहे त्या चौथ्या पवाराकडून! अन् इकडं ठाकरे कौतुक करीत सुटलेत त्या चौथ्या पवाराचं! सारं काही ठरवून चाललंय! ‘पंत चढले राव आले’ अशी एक व्यवहारी म्हण आहे अन् त्या धर्तीवर ‘पार्थ पडले रोहित चढले’ असेच म्हणायला लागेल, असं मी नाही ‘सामना’ म्हणतोय! बोल आता! आजोबांवर विरोधक शाब्दीक हल्ले करत असताना पवारांचा नातू ज्या पद्धतीने पुढे आला ते पाहता हा रोहित पवार कोणीही सहज घेण्याची चूक करू नये! बाळासाहेब विखेंचा नातू सुजय विखे हा जसा राष्ट्रवादीने ‘सहज’ घेतला तसा पवारांचा हा नातू राहीत पवार कोणी सहज घेत असतील तर त्यांची मोठी चूक ठरणार आहे. हा चौथा पवार अत्यंत पद्धतशिरपणे कर्जत- जामखेडमध्ये घुसलाय आणि कासवगतीने पुढे निघाला आहे. या कासवगतीने चालत असताना रोहीत पवार याने कालच्याला थेट अमित शाह यांच्या आरोपांना ज्या पद्धतीने आणि ज्या भाषेत उत्तर दिलं ते पाहता हा चौथा पवार नक्कीच दखलपात्र आहे. चाणक्षवृत्तीच्या उद्धव ठाकरे यांनी हेच हेरलं आणि त्या चौथ्या पवाराच कौतुक केलं. ते देखील तोंडभरुन ! वास्तविक पाहता अमित शाह यांच्यासमोर विकासाचे अनेक मुद्दे होते. पण त्यांनी ते सोडून शरद पवार यांच्यावर घराणेशाही, भ्रष्टाचार यावर हल्लाबोल केला. मागील निवडणुकीतही पवारांवर हे हल्ले झाले आणि आताही! त्यात नवीन ते काय? मात्र, यावेळी पवारांवरील या टीकेवर ‘चौथ्या’पवारांनी उत्तर दिल्याचे सांगत ठाकरे यांनी ‘सामना’ मधून रोहित पावर यांचे कौतुक केले. भक्ता, पवारांच्या गोटातील हा रोहीत पवार याचा तीर कोणीही सहज किंवा दुर्लक्षूण चालणार नाही. हा तीर अनेकांना घायाळ करणाराच ठरणार आहे. विखेंच्या नातवाने तीन वर्षे आधीपासूनच दक्षिणेचा खासदार मीच असणार असं ठामपणे व छातीठोकपणे सांगत सार्‍यांनाच घाम फोडला! फरक इतकाच होता की, सुजय विखे पक्ष व चिन्ह सांगत नव्हते! राहित पवार हे पक्षही सांगत आहेत आणि चिन्हही! रोहित पवार हा चौथा पवार अत्यंत धूर्तपणे चाल खेळताना दिसत आहे. हा चौथा पवार कर्जत- जामखेडमध्ये राम शिंदे यांच्या विरोधात लढणार हे नक्की! इथला निकाल काहीही लागो! पण, हा चौथा पवार राज्याच्या राजकारणात निर्णायक ठरणार हे नक्की! कारण पवारांच्या गोटातून बर्‍याच वर्षानंतर प्रथमच जोरदार तीर सुटलाय! हा तीर कोणाच्या दिशेने आहे हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही रे भक्ता! विखेंच्या नातवाने इतिहास घडवला तो याच जिल्ह्यात अन् पवारांच्या नातवानेही याच जिल्ह्यात इतिहास घडवला तर आश्‍चर्य वाटू नये इतकेच! भरपूर काही बोलायचं आहे…. पुन्हा भेटल्यावर बोलू, असं बोलून बाप्पा पाठमोरा झाला अन् मीही त्याचा निरोप घेतला!

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!