मोरया रे…! / शिवाजी शिर्के….. ‘संग्राम’चा ‘ग्राफ’!

‘त्यानं’ लढायचं ठरवलंय; राठोडही लढणार!

मोरया रे…! / शिवाजी शिर्के

नातवांच्या पुराणात विखेंचा नातू कसा सरस बसला अन् आता येऊ घातलेल्या निवडणुकीत पवारांचा नातू कसा दुर्लक्षूण चालणार नाही याबाबतचे विवेचन बाप्पा गणेशानं दिलं होतं. ठाकरेंनी चौथ्या पवाराचं म्हणजेच रोहित पवार याचं केलेलं कौतुक अन् त्यातून पालकमंत्री ऊर्फ सालकरी राहिलेल्या राम शिंदे यांच्या पोटात किती मोठा गोळा आला असेल याचा अंदाज बांधत नगर शहरातील गणेशोत्सवात फेरफाटका मारत असतानाच टिळक रस्त्यावर बाप्पा गणेशा माझ्या समोर ठाकला!

मी- बाप्पा, चितळे रस्त्यावर जाम गर्दी झालीय. आरस पाहण्यास अन् तुझ्या दर्शनास! तू तर इकडे टिळक रस्त्यावर कसा?

श्रीगणेशा- भक्ता, तिकडे काही जण काळजीत पडलेत! जगतापांचा संग्राम म्हणजेच तुमच्या शहराचा सध्याचा आमदार कोणालाच काही कळू द्यायला तयार नाही. नक्की काय चाललंय त्याचं हेच कळेनासं झालंय सार्‍यांना!

मी- बाप्पा, काय ते स्पष्ट बोल!

श्रीगणेशा- भक्ता, गणेशोत्सव माझा आणि माझ्या भक्तांचा असला तरी नगरमध्ये वारे निवडणुकीचे वाहत आहे. या वार्‍याची दिशा स्पष्ट व्हायला तयार नाही. तो काकांचा संग्राम भलताच फॉर्ममध्ये दिसतोय! पवारांना काळजीत टाकलंय त्याने अन् इकडे चितळेरोडवर भलतीच चर्चा! अन् वरतून संग्राम म्हणतो, ‘मी तर जाग्यावरच हाय! मी कोठेच गेलो नाही’! शिवसेनेचे स्थानिक नेते- पदाधिकारी, ‘संग्राम नको’, असं म्हणू लागले असताना संग्राम काही केल्या स्पष्टपणे बोलत नाही.

मी- बाप्पा, बोलणार नाही संग्राम! मागच्या निवडणुकीतही संग्रामने दोन महिने आधी तयारी चालू केली होती! निवडणूक जाहीर झाली त्यावेळी त्या संग्रामच्या प्रचाराच्या दोन फेर्‍या संपल्या होत्या.

श्रीगणेशा- अरे भक्ता, पण त्यावेळी त्याची पहिलीच निवडणूक होती. आता तो दुसर्‍या निवडणुकीला सामोरे जात असताना देशात आणि राज्यात राजकीय वारे वेगळ्या दिशेने जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्याने घड्याळ हातात बांधले आणि उमेदवारी केली. पण, पराभव पदरी आला. शिवाय विखेंच्या विरोधात लढला संग्राम! नगर शहरातून विखेंना एवढे मताधिक्य मिळेल असे कोणालाच वाटत नव्हते. मात्र, झाले तसेच! हे मताधिक्यच संग्रामसाठी धोक्याची घंटा ठरली असं वाटू लागलंय! त्या निवडणुकीत शिवसेनेच्या राठोडांनी स्वत:ची निवडणूक समजून विखेंचा प्रचार केला आणि आज तेच राठोड संभ्रमात दिसत आहेत. सुजय विखेंनी तर जाहीरपणे सांगितलंय की महिनाभर मी नगर शहरात येणार नाही. मग, असे असताना निवडणुकीचे गणित राठोड कसे जुळवणार?

मी- अहो, ते राठोड आहेत! गणित जुळवायला माहिर आहेत ते!

श्रीगणेशा- भक्ता, हाच फाजील आत्मविश्‍वास नडला मागच्यावेळी त्या राठोडांना! आताही तेच दिसतंय! जवळ असणार्‍यांनी शेवटच्या क्षणी कशी साथ सोडली हे पाहिलंय अन् अनुभवलंय! भक्ता, त्याहीपेक्षा यावेळी संग्राम शिवसेनेकडून लढणार अशी चर्चा रंगात आली आहे. कळमकरांनी जगतापांबद्दल काहीतरी उलटं भरवलंय पवारांच्या दरबारात! अन् इकडे शिवसेनेत संग्राम येणार अशी चर्चा झडत आहे. काहीतरी शिजतंय नक्कीच! मागील महिन्यात सुप्रिया सुळे अन् त्याआधी खा. अमोल कोल्हे नगरमध्ये आले. त्यांच्या सोबत आलेल्या काही निवडक कार्यकर्त्यांची जेवणाची सोय कोणी करायची असा सवाल आला. एका हॉटेलमध्ये त्यांच्यासोबतच्यांना जेवू घातलं! पण, त्या हॉटेलची बिलं अजूनही गेली नाही. जगतापांच्या डोक्यात काहीतरी शिजतंय असंच काहीसं यातून मग थेटपणे थोरल्या पवारांकडे गेलं असेल! बरं, संग्राम या सार्‍या विषयांवर काही केल्या बोलायला तयार नाही. संग्रामला शिवसेनेत घेऊ नका असं सेनेचे पदाधिकारी मातोश्रीवर जाऊन सांगत आहेत आणि स्थानिक पातळीवर ‘सोशल वॉर’ व बातम्यांमधून संग्राम यांच्या सेना प्रवेशाला विरोध केला जात आहे. पण, मी कुठं गेलोच नाही तर प्रवेशाचा विषय येतो कुठं, असं म्हणून संग्राम आणखी गोंधळ तयार करीत नाही ना! जे काही चाललंय ते खूपच वेगळ्या वळणावर दिसतंय! गेल्या काही दिवसात नगरमधील संग्रामच्या सोशल मिडियावरील पोस्टमधून ‘घड्याळ’ गायब कसं काय झालंय? काहीही असलं तरी संग्रामच्या डोक्यात निवडणुकीचं वेगळं गणित दिसतंय अन् गेल्या महिनाभराच्या आधीपासून संग्रामने चौक सभा, बैठकांमधून आशीर्वाद मागायला प्रारंभ केला आहे. विकास कामांसाठी माझी उमेदवारी असं जाहीरपणे सांगताना नगरच्या तरुणाईला साद घालणारा संग्राम त्याच्या निवडणूक चिन्हा विषयी व राजकीय पक्षाविषयी चकार शब्द बोलायला तयार नाही. नगरी राजकारण खूपच आतल्या गाठीचं असं म्हटलं जातं. पण आता त्यात भर पडलीय ती नगर शहराच्या राजकारणाची! संग्रामच्या ‘वेट अँड वॉच’ भूमिकेची! शिकार टप्प्यात आल्याशिवाय टिपायची नाही असंच काहीसं संग्रामने ठरवलेलं दिसतंय! नक्की काय ते समजेलच! तूर्तास थांबतो मी येथेच! पुन्हा भेटूच उद्या… असं म्हणत बाप्पाने चितळे रस्त्याकडे कूच केलं. अन् मीही माझ्या घराकडे!

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!