अनधिकृत नळ कनेक्शन कारवाई करून बंद करा

महापौर बाबासाहेब वाकळे यांचे आदेश । केडगाव पाणी पुरवठा विभागाची आढावा बैठक

अहमदनगर । नगर सह्याद्री

बाबर मळा भागात असलेल्या लाईनवर अनधिकृत कनेक्शनवर कारवाई करून बंद करण्याच्या सुचना दिल्या. कायनेटीक चौक परिसरात पाण्याच्या लाईनला प्रेशर नसल्यामुळे या परिसरात नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टिने त्या भागात काय उपाय योजना कराव्या लागेल त्या तातडीने करण्याचे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिले.

केडगाव परिसराला पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टिने विभागाची आढावा बैठक गुरूवारी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपमहापौर मालन ढोणे, नगरसेवक मनोज कोतकर, राहुल कांबळे, प्रदीप पठारे, सुरज शेळके, गणेश नन्नवरे, अभियंता काकडे, केडगांव विभाग प्रमुख सुखदेव गुंड, आदी उपस्थित होते.

महापौर वाकळे यांनी केडगाव भागात किती उंच टाक्या आहेत, नळ कनेक्शन किती आहेत, उपलब्ध कर्मचारी याची माहिती घेतली. केडगाव भागामध्ये काही भागात 2 दिवसाआड पाणी पुरवठा, तर काही भागामध्ये 4 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. कापरे मळा उंच भागात असल्यामुळे या भागात पाणी पुरवठा करण्यास अडचण असल्यामुळे आवश्यक त्या उपाय योजना करून तेथे पाणी पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या.

इंदिरा नगर भागामध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो. या टँकरच्या खेपा व्यवस्थित करत नसल्यास तो टँकर रद्द करून नविन टँकर सुरू करण्याबाबत निविदा काढण्याच्या सुचना दिल्या. केडगाव भागात लाईन लिकेज झाल्यास दुरूस्ती करण्यासाठी जेसीबी व मशिनरी उपलब्ध करून देण्याबाबत आदेश दिले.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!