शरण मार्केट मधील गाळेधारकांचे पुनर्वसन करा – काळे

अहमदनगर । नगर सह्याद्री

शरण मार्केट मधील गाळ्यांवर बुलडोझर चालवून प्रशासनाने येथील व्यावसायिकांना रात्रीतून रस्त्यावर आणले आहे. आता महापालिकेनेच गाळेधारकांचे तातडीने कायमस्वरूपी पुनर्वसन करून गाळेधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.

महापालिकेने केलेली ही कारवाई अन्यायकारक आहे. सन 2000 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी यांनीच शहरातील हातावर पोट भरणार्‍या टपरीधारक, हातगाडी चालकांना ही जागा उपलब्ध करून दिली होती. याचा प्रशासनाला विसर पडलेला दिसतो. तत्कालीन जिल्हाधिकारी विलेंद्र शरण यांच्या आदेशा वरुन नगरपालिकेनेच हे गाळे बांधले होते. नगरपालिकेने बांधलेले गाळे बेकायदेशीर अथवा अतिक्रमीत कसे होऊ शकतात.

महापालिकेच्या या कारवाईमुळे गरीब व्यावसायिकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. त्यांच्याकडे उपजीविका चालविण्याचा कोणताही पर्याय राहिलेला नाही. यातून मिळणार्‍या उत्पन्नावर त्यांची कुटुंबे चालतात, मुले शिक्षण घेतात. त्यामुळे ही कारवाई करण्यापूर्वी महापालिकेने गाळेधारकांच्या पुनर्वसनाचे आधी नियोजन करून मग कारवाई करायला पाहिजे होती.

सन 2000 मध्ये प्रशासनाने तात्पुरते पुनर्वसन केले होते. आता महापालिकेने गाळेधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन केले पाहिजे. महापालिका पाडापाडी करण्यामध्ये कायम अग्रेसर असते. नेहरू मार्केट पाडण्याची तत्परता दाखविणार्‍या महापालिकेला अजूनही त्याठिकाणी नियोजित उभारणीचे काम करणे जमलेले नाही.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!