सारिपाट / शिवाजी शिर्के…….. बाऽऽऽ पांडुरंगा, धोकादायक शाळा खोल्यांचं तेव्हढं बघ! 

नगरच्या जिल्हा परिषदेत आणि प्राथमिक शिक्षण विभागात साराच ‘आनंदी- आनंद’ | कोणाचाच कोणाला पायपोस राहिला नाही | विद्यार्थ्याची सुरक्षा रामभरोसे

सारिपाट / शिवाजी शिर्के

देशाला आणि राज्याला चांगले प्रशासकीय अधिकारी, उत्तम समाजकारणी आणि राजकारणी ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेने दिले त्याच जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था आज अत्यंत दयनीय झाली आहे. समाजमंदिरे आणि ग्रामपंचायतीच्या जुनाट इमारतींमध्ये तब्बल ९२८ वर्ग भरविले जात आहेत. राज्यातील चार हजारापेक्षा जास्त शाळा खोल्या धोकादायक असल्याचा अहवाल समोर आला असताना त्यात एकट्या नगर जिल्ह्यातील धोकादायक शाळा खोल्यांची संख्या हजाराच्या घरात आहे. या शाळा खोल्या दुरुस्त होण्यासाठी अथवा त्या निर्लेखीत करून नवीन खोल्यांचे बांधकाम होण्यासाठी काहीतरी हालचाल करावी असे ना प्रशासनाला वाटले ना पदाधिकार्‍यांना! निंबोडीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होईल आणि मग हे सारेच आरोप-प्रत्यारोप करत बसतील!

राज्यातील प्रगतशिल जिल्हा म्हणून ओळख असणार्‍या नगरमध्ये जे काही चाललंय ते नक्कीच भूषणावह नाही. नगरच्या जिल्हा परिषदेचा राज्यात असणारा नावलौकीक कमी झालाय का असाच काहीसा सवाल सध्या उपस्थित होतो आहे. कोणत्याही कामासाठीचा निधी नगर जिल्हा परिषदेने मागणी केला की लागलीच उपलब्ध व्हायचा! मात्र, गेल्या काही वर्षात हे सारेच थांबले! जिल्हा परिषदेची सत्ता कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने पालकमंत्री राम शिंदे यांनी झेडपीची आणि पदाधिकार्‍यांची कोंडी करण्याचा एकही प्रयत्न सोडला नाही. राम शिंदे यांच्या इशार्‍यावर आणि आदेशावर झेडपीचा कारभार चालला! पदाधिकार्‍यांनी याबाबत अनेकदा आकंडतांडव केले. मात्र, प्रशासनाने आदेश पाळले ते राम शिंदेचे!

डॉ. सुजय विखे पाटील भाजपाकडून खासदार झाले आणि त्यापाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करीत कॅबिनेट मंत्रीपद मिळविले. विखे पाटील भाजपात आल्याने झेडपीचा कारभार नीट चालेल असे वाटत असताना प्रत्यक्षात झेडपीच्या अधिकार्‍यांवर कंट्रोल राहिला तो राम शिंदे यांचा! त्यातून विखे पाटील दुखावणे स्वाभाविक होते. माजी सैनिकाच्या पत्नीच्या बदलीचे निमित्त समोर आले आणि मग लागलीच विखे पाटलांनी याचे सोने केले. कायमच विरोधात भूमिका घेणार्‍या आणि सहकार्याची भावना न जपणार्‍या विश्‍वजीत माने यांच्यावर अविश्‍वास ठराव आणण्यासाठीची मोहीत हाती घेतली. आता त्यावर पुढील आठवड्यात चर्चा होईल आणि ठराव संमत होऊ शकतो.

प्रशासन आणि पदाधिकार्‍यांमधील हा संघर्ष टोकाला गेला असताना पावसाळ्यास प्रारंभ झाला आणि धोकादायक वर्ग खोल्यांचा विषय ऐरणीवर आला. दोन वर्षापूर्वी निंबोडी (नगर) येथे पावसाळ्यातच धोकादायक झालेली शाळेची इमारत कोसळली आणि विद्यार्थी दगावले, काही जखमी झाले. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि जिल्हा परिषदेच्या मालकीच्या धोकादायक झालेल्या वर्गखोल्यांची माहिती संकलीत केली गेली. त्यानुसार माहिती समोर आली आणि ९२८ खोल्या धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. धोकादायक झालेल्या या शाळा खोल्या पाडण्यास मंजुरी मिळाली असतानाही आजपर्यंत त्यासाठीचा मुहूर्त जिल्हा परिषदेला मिळालेला नाही.

जिल्हा परिषदेकडून बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठविले गेले. या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यानुसार आता धोकादायक वर्ग खोल्या पाडण्याचे काम होणे गरजेचे असताना कोणीही या विषयावर पुढील कार्यवाही करण्यास तयार नाही. जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांसह सदस्यांनाही या विषयाचे कोणतेही सोयरसुतक नाही. प्रशासन काम करीत नाही, असे म्हणून पदाधिकारी – सदस्य या विषयावर आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असतील तर ते वाईटच! सर्वसाधारण सभेसह स्थायी व शिक्षण समितीच्या बैठकीत हा विषय अनेकदा चर्चेत आला. पदाधिकार्‍यांनी प्रशासनास आदेश दिले. पण, पुढे काहीच नाही. आता पावसाळ्यास प्रारंभ झाला असताना या धोकादायक शाळा खोल्यांचे काय?

धोकादायक वर्गखोल्यांमध्ये आज काही ठिकाणी शाळा भरविली जात नसली तरी या खोल्यांच्या आजूबाजूला विद्यार्थ्यांचा राबता असतो. दुर्दैवाने त्याच वेळी असा अनर्थ घडला तर काय? दोन वर्षात काहीच कारवाई न करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांच्यावर कारवाई करण्याआधी झेडपी सीईओ आणि पदाधिकारी कारवाई करणार ती मुख्याध्यापक अथवा संबंधित शिक्षकांवर! त्यांचा यात दोष काय? ज्यांचा दोष आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस ना पदाधिकारी- सदस्य दाखविणार आणि ना प्रशासन प्रमुख! या सार्‍या गोंधळात विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेच्या परिसरात यावे लागते आणि शिक्षण घ्यावे लागत असेल तर ही बाब जिल्ह्याच्या नावलौकीकास नक्कीच साजेशी नाही! पंढरीच्या पांडुरंगालाच आता पालकांसह विद्यार्थ्यांना साकडे घालावे लागणार आहे. कोणतेही संकट विद्यार्थ्यांवर येऊ नये यासाठी, बा… पांडुरंगा या धोकादायक शाळा खोल्यांचा ‘निकाल’ लावण्याची सद्बुद्धी झेडपीच्या कारभार्‍यांना आणि प्रशासनाला दे इतकेच!

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!