सारिपाट/ शिवाजी शिर्के….. टाळूवरचे लोणी खाणार्‍या अवलादी!

नगरच्या मार्केटमध्ये शेतकर्‍यांना लुटणार्‍या टोळ्या | शेतकरी कुटुंबातील ‘राजाश्रीत’ दुकानदाराकडे सापडली कोट्यवधींची किटकनाशके!

सारिपाट/ शिवाजी शिर्के

शेतकरी हितासाठी स्थापन करण्यात आलघेल्या बाजार समितीच्या आवारात शेतीसाठी आवश्यक असणार्‍या खते- बिबियाणे आणि किटकनाशकांची विक्री करणारी दुकाने थाटली. या दुकानांमधून शेतकर्‍यांना योग्य दरात आणि प्रमाणीत केलेली औषधे मिळतात असा अनेक दिवसांचा भ्रम एकदाचा दूर झाला.

उच्च किमतीची खते, औषधे आणि बियाणे निकृष्ट कशी निघतात आणि त्यापायी शेतकर्‍याचे कसे नुकसान होते याची अनेक उदाहरणे आहेत. नगरच्या बाजारात शेतकर्‍यांना लुटणार्‍या अशा दुकानांच्या टोळ्याच आहेत. या टोळ्यांना राजाश्रय असल्याचे लपून राहिलेले नाही. नगरच्या बाजार समिती आवारात ‘पृथ्वी’च्या माध्यमातून अनेक वर्षांपासून राजरोस लुट केली जात होती. अर्थात ‘पृथ्वी’ हे यातील हिमनगाचे टोक आहे अस म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

शतीसाठी आवश्यक असणार्‍या किटकनाशकांची मुदत संपली तरी त्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुकानात काम करणारा एक कर्मचारी नोकरीतून काढला आणि त्यानेच या काळ्या धंद्याला वाचा फोडली. शेतकर्‍यांसाठी स्थापन केलेल्या नगर बाजार समितीच्या आवारातील पृथ्वी ऍग्रो सर्व्हिसेसच्या गोदामावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकला.

मुदतबाह्य किटकनाशकांवरील लेबल बदलून नव्याने लेबल लावण्याचा प्रकार येथे सुरू होता. या कारवाईत पथकाने मोठ्या प्रमाणात किटकनाशके जप्त केली आहेत. कृषी विभागाच्या मुख्य गुणवत्ता नियंत्रण पथकाने मार्केटमधील पृथ्वी ऍग्रो सर्व्हिसेसच्या गोदामावर छापा टाकला.

मुदतबाह्य झालेल्या किटकनाशकांवरील लेबल बदलून त्यावर नव्याने लेबल लावण्याचा प्रकार येथे सुरू होता. लेबल लावण्याचे साहित्य भरारी पथकाने जप्त केले आहे. यामध्ये नव्याने तयार करण्यात आलेले वेस्टन, शिक्के, बाटल्या, ब्लेड आणि थिनर असे काही साहित्य पथकाने जप्त केले. यानंतर कृषी विभागाने गोदाम सील केलेे. मुद्देमाल जप्त केला.

पृथ्वी ऍग्रो हे दुकान नगर तालुक्यातीलच हराळ यांच्या मालकीचे! हराळ हे स्वत: शेतकरी कुटुंबातील असताना त्यांनी शेतकर्‍यांची फसवणूक करण्याचा धंदा मांडला हे दुर्दैव! शेतकरी अडचणीत असताना व त्याच्या किमानपक्षी शेतकरी कुटुंबातील व्यावसायीकांकडून चांगल्या अपेक्षा असताना त्याचीच फसवणूक केली गेली हे विशेष! हराळ सारखे अनेकजण बाजार समिती आणि समितीच्या आवारात दुकान थाटून बसलेत आणि शेतकर्‍यांची दिवसाढवळ्या फसवणूक करीत आहेत.

तरीही त्यांच्यावर कोणीच कारवाई करीत नाही हे विशेष! कृषी विभागाने धाडस दाखवून हा गोरख धंदा मोडून काढला असला तरी त्याच्या खोलात जाण्याची आवश्यकता आहे. कृषी विभागाच्या पथकाने गोदामावर छापा टाकून येथील किटकनाशके व अन्य साहित्य जप्त केले आहे.

तसेच हे गोदामदेखील सील केल्यानंतर आता पुढील कारवाई करण्याच्या दिशेने विभागाने कार्यवाहीस सुरुवात केली आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे. त्यानंतर आता संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल होणार असला तरी त्याची पाळेमुळे शोधण्याची गरज आहे.

खरीप हंगामाच्या अनुषंगाने जून महिन्यात पेरण्यांना सुरुवात होत असल्याने खते व बियाण्यांचा पुरवठा होत आहे. कृषी सेवा केंद्रात किटकनाशके खते घेण्यासाठी शेतकरी येत आहेत. येथे मात्र शेतकर्‍यांची फसवणूक होण्याची शक्यता वाढली आहे. मुदतबाह्य झालेले किटकनाशके पुन्हा बाजारात आणण्याचा प्रयत्न होत आहे.

यासाठी नवे स्टीकर व वेस्टन तयार केले जात असल्याचा प्रकार होत असल्याचे या कारवाईतून पुढे आले आहे. खरीप हंगाम अद्याप सुरू झालेला नाही. त्याआधीच असा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली. शेतकर्‍यांची फसवणूक करण्याचा अत्यंत घाणेरडा प्रकार शेतकरी कुटुंबातील दुकानदाराने करावा हेच सर्वाधिक वाईट!

कोट्यवधींची फसवणूक तरीही हराळकडून दुकानदाराचीच चापलुसी!

मुदतबाह्य झालेल्या किटकनाशकांची नव्या स्टीकरच्या आधारे विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर व त्यातून कोट्यवधी रुपयांचा शेतकर्‍यांना चुना लागला असल्याचे समोर असताना जिल्हा परिषदेचा माजी सदस्य बाळासाहेब हराळ हा त्या दुकानदाराला वाचविण्यासाठी धडपडत होता. कोट्यवधी रुपये किमतीची मुदतबाह्य अशी ही औषधे शेतकर्‍यांच्या माथी मारण्याचा गोरख धंदा नगरच्या बाजार समितीच्या आवारात व परिसरात असणार्‍या दुकानांमधून राजरोस चालविला जात असून त्याला बाजार समितीचे आशिर्वाद असल्याचे बोलले जात आहे.

लेबल कोठे छापले; शिक्के कोणी तयार केले?

मुदतबाह्य झालेल्या किटकनाशकांवरील लेबल बदलून त्यावर नव्याने लेबल लावण्याचा प्रकार येथे सुरू होता. लेबल लावण्याचे साहित्य भरारी पथकाने जप्त केले आहे. यामध्ये नव्याने तयार करण्यात आलेले वेस्टन, शिक्के, बाटल्या, ब्लेड आणि थिनर असे काही साहित्य पथकाने जप्त केले. याचाच अर्थ येथे कंपनीच्या नावाने बोगस लेबल तयार केले गेले. ते कोणी व कोठून छापून घेतले याची चौकशी आता झाली पाहिजे. याशिवाय सदरच्या बनावटीमध्ये जे शिक्के वापरले गेले तेही बोगसच! आता या सार्‍या गोष्टींची चौकशी झाली तर मोठी टोळीच समोर येऊ शकते.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!