सारिपाट / शिवाजी शिर्के…. गुलालापेक्षा चर्चा झडतेय ती दगाफटक्याची

दगाफटका, बेरीज, वजाबाकीच्या आकडेमोडीत उमेदवारांसह सारेच हैराण | वाढलेला टक्का कोणाचा? | नगर शहरातील मताधिक्य कोणाच्या फायद्याचे?

सारिपाट / शिवाजी शिर्के

नगर लोकसभेच्या जागेसाठी मतदान प्रक्रिया एकदाची पार पडली. कडक उन्हाच्या जोडीने बंद पडलेल्या इव्हिएम मशिनचा झटका कोणाला बसतो याकडे आता सार्‍यांच्याच नजरा लागल्या आहेत. उमेदवार आणि त्यांचे समर्थक सोयीनुसार दावे करीत असले तरी मतदान संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत आकडेमोड करीत दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या समर्थकांनी विजयाचे गणित मांडले. दोघांच्याही समर्थकांनी विजय हा घासून आणि अवघ्या वीस- तीस हजारांच्या फरकाने होणार असल्याचा दावा केला. हाच दावा दोन्ही प्रमुख उमेदवारांसाठी घातक ठरणारा असल्याने दोघांचेही ब्लडप्रेशर वाढलेले असणार आहे आणि कधी एकदाचा महिन्याचा कालावधी उलटतो व निकाल बाहेर येतो अशी अवस्था सर्वांचीच झाली आहे.


लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदारांनी मताधिकार बजावल्यानंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर विजयाचे दावे-प्रतिदावे केले आहेत. दोन्ही बाजूने प्रबळ दावे केले जात असताना विजयाची मतदारसंघ, तसेच तालुकानिहाय गणितेही मांडण्यात आली आहेत. वैयक्तिक ओपिनियन पोल मांडून उमेदवाराला आतापासूनच खासदार म्हणायला सुरुवात केली.


लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महिनाभरापासून राजकीय आखाडा रंगात आला होता. नगर लोकसभेच्या जागेसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी भाजपचा झेंडा हाती घेऊन निवडणूक रिंगणात उडी घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही प्रबळ उमेदवार म्हणून आमदार संग्राम जगताप यांना रिंगणात उतरवले. या निवडणुकीत तब्बल १९ उमेदवार नशीब आजमावत आहेत. मत देण्याचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या, रात्री उशिरापर्यंत हाती आलेल्या आकड्यानुसार सरासरी सुमारे ६५ टक्के मतदान झाले. दिवसभर सोशल मीडियावर मतदानाची टक्केवारी शेयर करण्यासाठी चढाओढ पहायला मिळाली. त्याबरोबरच सोशल मीडियावर असलेल्या उमेदवारांच्या पेजवरही विजयाचे दावे प्रतिदावे केले जात होते. कोणता तालुका कोणत्या उमेदवाराला किती देणार याचे ओपिनियन पोल, विजय फिक्स, भावी खासदार अशा शब्दांत दावे केले जात होते. एकूणच चुरशीने झालेले मतदान आणि नगर शहरात वाढलेला मतांचा टक्काच या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.

मतदानाच्या शेवटच्या २४ तासात व्हायरल झालेल्या सोशल पोस्ट
(याची सत्यता किती राहिली हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.)


डॉ. सुजय विखे पाटील समर्थकांचा ‘सोशल दावा’

राहुरी- राहुरी तालुक्यातून २० हजारांचे मताधिक्य मिळणार. होम तालुकाच असल्याने येथे जगताप यांची दाळ शिजणार नाही.
नगर तालुका – नगर तालुक्यात आ. कर्डिले समर्थकांनी जावई (आ. जगताप) यांचेच काम केले. मात्र, विरोधी महाआघाडी, (कॉंग्रेस- शिवसेना) विखेंच्या सोबत राहिली. त्यामुळे नगर तालुक्यात जगताप यांच्या बरोबरीची मते घेऊ.
नगर शहर- मतांचा टक्वा वाढला असला तरी तो आमच्याच पथ्यावर. जगताप यांना नगर शहरातून मताधिक्य मिळणार नाही. आम्ही (विखे) दहा- पंधरा हजारांचे मताधिक्य घेऊच.
पाथर्डी- आ. मोनिका राजळे व त्यांचे समर्थक सक्रिय राहिले. वंजारी समाजाची मते आमच्याच बाजूने. वीस हजारांचे मताधिक्य आम्हाला (विखे) मिळेल.
शेवगाव- जगताप यांच्या बरोबरीने आम्ही येथे राहू. त्यांना मताधिक्य मिळणार नाही. त्यांना रोखलेय.
जामखेड- जामखेडमध्ये आघाडी मिळाली नाही तरी आम्ही बरोबरीत राहू. थोडाफार दगाफटका झाला नसेल तर आमचीच आघाडी दिसेल.
कर्जत- पालकमंत्री व त्यांचे सहकारी मनापासून सक्रिय होते. कोणी काहीही दावा केला तरी या तालुक्यातून किमान दहा हजार मतांची आघाडी मिळेल.
श्रीगोंदा- जगताप यांना आघाडी मिळणार नाही. आम्ही त्यांना रोखण्यात यशस्वी झालोय. करिष्मा लागू पडला तर आम्हीच येथे आघाडीवर असू.
पारनेर- तीसर्‍या पिढीचा थेट संपर्क आहे. आ. औटी व त्यांच्या सहकार्‍यांची साथ मिळाली आहे. या तालुक्यातून किमान तीस हजारांचे मताधिक्य मिळेल आणि हेच मताधिक्य आमच्यासाठी निर्णायक असेल.

आ. संग्राम जगताप समर्थकांचा ‘सोशल दावा’
राहुरी- विखेंसाठी हा तालुका महत्वपूर्ण होता आणि त्यांना येथे रोखण्यात आम्ही यशस्वी झालो. या तालुक्यात त्यांना मताधिक्य मिळणार नाही. आम्ही बरोबरीत राहू.
नगर तालुका- नगर तालुका आणि नगर शहर वेगवेगळे नाही. तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी त्यांच्याच घरातील व्यक्ती समजून मतदान केले. त्यामुळे या तालुक्यातून वीस हजारांचे मताधिक्य मिळेल.
नगर शहर- होमग्राऊंड आहे. विकास कामे आणि येथील मतदारांची नस माहिती आहे. सुखदु:खात धावून येणारा तरुण खासदार होणार असल्याने नगरकरांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून भूमिका घेतल्या. त्यांनी (विखे) आमचे मताधिक्य कमी करण्याचा प्रयत्न केला. सामदामदंडभेद असे सारे त्यांनी वापरले. पण, त्यात ते यशस्वी ठरणार नाही. नगर शहरातून किमान २५ हजारांचे मताधिक्य मिळेल. भिंगार शहरातून आमची निर्णायक आघाडी असेल.
पाथर्डी- वंजारी समाज ही भाजपाची जहागिरी नसल्याचे मतदान यंत्रातून जनतेने दाखवून दिले आहे. ढाकणे यांच्यासह सर्वच प्रमुख प्रचारात सक्रिय राहिले. त्यांना येथे मताधिक्य मिळणार नाही. आम्ही बरोबरीत राहू.
शेवगाव- घुले बंधू यांच्यासह काकडेताई व अन्य सर्वांनीच ही निवडणूक हातात घेतली होती. त्यामुळेच मतांचा टक्का वाढला आणि त्यातूनच येथे आम्हाला किमान १५ हजार मते जास्तीची मिळतील.
जामखेड- जामखेड तालुक्यातील जनता पुरती वैतागली आहे. मतांच्या विभाजनात राम शिंदे निवडून येतात. त्यांच्यावर प्रचंड नाराजी आहे. जामखेडमध्ये किमान १५ हजार मते आम्हाला जास्त मिळतील.
कर्जत- त्यांना (राम शिंदे) सवत (राधाकृष्ण विखे पाटील) कशी सहन हाईल? सवत नको म्हणूनच त्यांनी (शिंदे समर्थक) मदत केली. त्यातून आम्हाला किमान दहा हजार जास्तीची मते मिळतील.
श्रीगोंदा- घरचा मतदारसंघ. जिल्हा परिषदेचा एक गट जगताप कुटुंबाच्या ताब्यात आहे. याशिवाय तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी व त्यांच्या प्रमुखांनी मदत करण्यासाठीचा दिलेला शब्द पाळलाय. त्यामुळे आ. राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस व अन्य सर्वांनीच मोलाची भूमिका बजावली. त्यातून किमान २५ हजार जास्तीची मते येथून मिळतील.
पारनेर- राष्ट्रवादीच्या सर्वच गटांनी एकत्रीत भूमिका घेतली. ३५ वर्षे विखे खासदार तरी पाणी प्रश्‍न तसाच हाच कळीचा मुद्दा ठरणार निर्णायक. विखेंना मताधिक्य मिळणार नाही याची काळजी घेतली. सुजित झावरे, उदय शेळके, निलेश लंके, प्रशांत गायकवाड आदी प्रमुखांवर धुरा. आ. औटी यांच्याबद्दल काही ठिकाणी असणारी नाराजी आमच्यासाठी बेरीज करणारी ठरली. बरोबरीची मते मिळतील. किंबहुना आम्हीच मताधिक्य घेऊ.

दगाफटक्याची ‘घातक’ अन् ‘धाकधुक’ व्हायरल झालेल्या पोस्ट!
(हे मुद्दे दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी अत्यंत खुबीने व्हायरल केले आहेत. त्यात सत्यता असेलच असे नाही!)
(कमळ)
राहुरीत कर्डिले समर्थकांकडून जगताप यांना मदत. नगर तालुक्यात कर्डिले समर्थक जगतापांच्या सेवेत. नगर शहरात गांधी समर्थक व कर्डिले समर्थक जगताप यांच्या सोबत. राठोड शेवटच्या दोन दिवसात शांत बसले! सेनेचे काही नगरसेवक अलिप्तच! भिंगारमध्येही दगाफटका! कर्जतमध्ये विखेंच्या संभाव्य मंत्रीपदामुळे शिंदे समर्थकांची जगताप यांना रसद. पारनेरमध्ये एकसंघ वाटणार्‍या शिवसेनेत स्थानिक मुद्दयावर दोन गट आणि त्यातील एक गट जगताप यांच्यासोबत. औटींकडून दुखावलेले काही विखे समर्थकही जगतापांकडे! श्रीगोंद्यात पाचपुतेंच्या समर्थकांकडून शेवटच्या क्षणी जगताप यांचा निर्णय!

(घड्याळ)
नगर शहरातील काही महत्वाचे शिलेदार विखेंच्या सोबत! कॉंग्रेसच्या एका गटाकडून विखेंची साथ. केडगावमध्ये काही शिलेदार विखेंसोबत. ‘लग्नात हुंडा घेतला नाही’, असे सांगणारा जगतापांचा ‘जावई’च पारनेरमध्ये फुटला! राष्ट्रवादीच्या झेडपी सदस्य असणार्‍या माईंकडून सुजयदादा चालविण्याचे फोनवर आदेश ! शेवगावमध्ये घुलेंकडून विखेंना मदत!

कम्युनिस्टांच्या लाल पाकीटाचे यावेळीही झाले भगवेकरण!
जातीयवादी पक्षांच्या विरोधात सातत्याने भूमिका मांडणार्‍या आणि निवडणूका लढविणार्‍या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा अजेंडा सर्वश्रूत आहे. मात्र, यावेळी तसे घडले नाही. लाल बावट्याच्या पाकीटाचा रंग भगवा झाला. शेवटच्या दोन दिवसात हे सारे झाले. त्यासाठी काय मोजावे लागले याची चर्चा आता झडत आहे. मात्र, हे मोजून घेण्यासाठीच ’वेट अँड वॉच’च्या भूमिकेत ते होते असा टोमणा आता मारल जात आहे. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी तसेच केले होते आणि आता लोकसभा निवडणुकीतही! वाढीव टेंडरसाठी हे सारे करावे लागते, असा टोमणा आता कम्युनिस्टांकडूनच मारला जात आहे. पारनेर तालुक्यात एका रात्रीत लाल पाकीटाचा झालेला भगवा रंग त्याचे उत्तम उदाहरण म्हटले पाहिजे.

निकाल काहीही लागला तरी ‘यांच्यावर’ पडणार ‘खाट’!
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर जवळ राहून दगाफटका केलेल्या प्रत्येकाचा ‘कार्यक्रम’ होणार हे नक्की! विश्‍वासघात करणार्‍यांच्या यादीत कोणाचे नाव कुठे हेही निकाल लागताच स्पष्ट होणार आहे. जिल्ह्याच्या राजकारणाचा ‘सारिपाट’च या निवडणुकीच्या निकालाने बदलणार आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असणार्‍या विखे पाटील परिवाराच्या बाजूने निकाल लागला तरी आणि विरोधात गेला तरी हा सारिपाट बदलणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. निकाल बाजूने लागला तर ज्यांनी विरोधात भूमिका घेतल्या त्यांच्यावर ‘खाट’ आणि निकाल विरोधात गेला तर ज्यांनी जवळ राहून विश्‍वासघात केला अशांवर ‘खाट’ ठरलेली आहे. विश्‍वासघात करणार्‍यांवर ही ‘खाट’ विखे पाटील टाकणार की दस्तुरखुद्द शरद पवार हेच काय ते बाकी असेल!

विखे पाटलांच्या शिर्डीतील भूमिकेकडे लागले लक्ष!
डॉ. सुजय यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर व त्यांची भाजपाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशिर्वाद घेतले. त्याचवेळी शिर्डीतून शिवसेनेचा खासदार निवडून आणण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचे डॉ. सुजय यांना शब्द दिला. नगर लोकसभा मतदारसंघाचे मतदान आता संपले असल्याने विखे पाटील पिता-पुत्र शिर्डीकडे रवाना झाले आहेत. या दोघांचीही शिर्डीतील भूमिका काय असेल हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरले आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली आहे तर कॉंग्रेसने आ. भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे बंडखोरी करून अपक्ष राहिले आहेत. शिर्डीत जाऊन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्टार प्रचारक आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते या नात्याने कॉंग्रेस उमेदवार कांबळे यांचा प्रचार करण्याचा निर्णय विखे पाटलांनी घेतला तर ठाकरे यांना दिलेला शब्द तोडल्यासारखे होणार आहे. सेना उमेदवार लोखंडे यांचा प्रचार केला तर स्वत:च्याच पक्षाच्या उमेदवाराविरोधात भूमिका घेतल्याचा संदेश जाणार आहे. शिर्डीतील जागा तिरंगी लढतीत कॉंग्रेस जिंकू शकते असा अहवाल आता तयार झाला असताना व ही जागा जिंकण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे स्वत: सभा घेण्यासाठी येत असताना विखे पाटील नक्की काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!