सारिपाट/ शिवाजी शिर्के…. कायद्याचा धाक दाखवा नसता बांगड्या भरा!

नगर शहरात दंडेलशाही नक्की कोणाची? ही कोणती नवी स्टाईल? नगरकरांमध्ये शिवसेना आणि सेना नेतृत्वाच्या भूमिकेबद्दलच संशय

सारिपाट/ शिवाजी शिर्के

कोणतेही शासकीय योजनेतील काम मंजूर झाल्यानंतर व त्यासाठीचा निधी वर्ग झाल्यानंतर त्या कामास कार्यारंभ आदेश दिला जातो. असा आदेश संबंधित ठेकेदाराच्या हाती पडला की मग तो ठेकेदार संबंधित काम हातीे घेतो, असा सर्वसाधारण नियम. मात्र, नगरमधील शिवसेना आणि त्यांच्या नेतृत्वाला कायदा, नियम याचे काहीही देणेघेणे नाही. आम्ही सांगतो तेच आणि त्याच स्टाईलने झाले पाहिजे अशी आडमुठी आणि काहीशी दहशतीची भूमिका घेत थेट आयुक्तांसमोरच अधिकार्‍यावर बुट भिरकावला. यात कोणती मर्दुमकी? दंडेलशाही आणि दहशत नगरमध्ये नक्की कोणाची आहे हेच आता शिवसेनेने स्वत:च दाखवून दिले आहे.


कायद्याचा धाक आणि कायदा ज्यांनी पाळायचा त्यांनीच जर कायदा हातात घेतला तर मग बाकी कोणाला दोष देणार? नगर शहरात कायदा हातात घेण्याची शिवसेनेची ही पहिली वेळ नक्कीच नाही. आम्ही आमच्याच स्टाईलने जाब विचारणार ही त्यांची भूमिकाही नवीन नाही. अर्थात अन्य राजकीय पक्षांनी कायदा हातात घेतला नाही असे नाही. परंतू, शिवसेनेच्या बाबतीत नगरमध्ये जे काही घडतंय ते वारंवार घडतेय. शिवसैनिकांवर कारवाई केली तर लागलीच आमच्यावर प्रशासन सुडबुद्धीने कारवाई करतंय अशी आवई उठविण्यासही हेच सैनिक पुढे! जनतेच्या प्रश्‍नांवर राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांनी भांडलेच पाहिजे. परंतू हे भांडण कायद्याच्या चौकटीत आणि लोकशाही मार्गाचे असले पाहिजे. शिवसेनेची नगर शहरातील आंदोलने ही बर्‍याचदा लोकशाही मार्गाची नसतात हे वास्तव आहे.


महापालिकेत रस्त्याच्या मुद्यावर जे घडलं ते अगदीच भयानक! आयुक्तांच्या दालनात ठिय्या देत शिवसेनेचे मदन आढाव यांनी शहर अभियंता विलास सोनटक्के यांना चर्चेदरम्यान पायातील बूट काढून तो सोनटक्के यांच्या दिशेने भिरकावला. पण, तो त्यांनी चुकविला. त्यामुळे अनर्थ टळला. आयुक्तांच्या उपस्थितीत अभियंत्यावर बुट भिरकवला जात असेल तर हा दहशत निर्माण करण्याचाच प्रकार म्हटला पाहिजे. आम्ही सांगतो ते जर झाले नाही तर आम्ही बुटाने हाणतो हेच तर शिवसेना नेतृत्वाला आयुक्तांना दाखवून द्यायचे नव्हते ना अशी शंका आता येऊ लागली आहे. घटना घडल्यानंतर आयुक्तांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिस येण्याआधीच सेनेचे वाघ महापालिकेतून पसार झाले. जनतेच्या प्रश्‍नावर भांडले असतील आणि आंदोलनाचा हेतू स्वच्छ होता तर मग पोलिस येत असल्याचे पाहून पसार होण्याचे कारण काय?


बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक, या रस्त्यांच्या कामासाठी फेब्रुवारीमध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला. परंतु त्यापूर्वीच महापालिका निवडणुकीपूर्वीच सेनेच्या नगरसेवकांनी कामचे उद्घाटन केले. ठेकेदारानेही रस्ता खोदला. ठेकेदाराने गेली सहा महिन्यापासून खोदून ठेवला आहे. अर्धवट काम सुरु करण्याची मागणी वेळोवेळी प्रशासनाकडे करण्यात आली. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आल्याचे सेनेकडून सांगण्यात येते. आंदोलन आणि जाब विचारलाच गेला पाहिजे. परंतू लोकशाही पद्धतीने! ठोकशाही पद्धतीने नाही.


कार्यारंभ आदेशापूर्वीच रस्ता ठेकेदाराने कशासाठी खोदला, याची चौकशी करुन संबंधित ठेकेदारावर कारवाई होण्याची गरज आहे. रस्त्याच्या कामाला कार्यारंभ आदेश केव्हा मिळाला, रस्ता कशासाठी खोदला गेला, कुणाच्या सांगण्यावरुन खोदण्यात आला, याची संपूर्ण चौकशी करुन आता सार्‍यांनाच पोलिसी खाक्या दाखविण्यासाठी आणि कायद्याचे राज्य असल्याची जाणिव करून देण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला नाही तर प्रशासन प्रमुख म्हणून त्यांनीही बांगड्याच भराव्यात!

सुजयदादा नगर शहरात नक्की दहशत कोणाची आहे?
नगर शहर दहशतमुक्त करायचे असल्याचे शिवसेनेने एकदा नव्हे हजारदा जाहीरपणे सांगितले. आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने भाजपा उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही तोच मुद्दा उचलला आणि नगर शहरातील दहशत मोडीत काढायची असल्याचे सांगितले. काल महापालिकेत जे झाले ते पाहता दहशत नक्की कोणाची आहे याचे आत्मचिंतन विखे पाटलांनी करण्याची गरज आहे. चुकणार्‍या आणि कामचुकार करणार्‍या प्रशासनाला जाब नक्की विचारला पाहिजे. परंतू बूट फेकून मारण्याची ही कोणती पद्धत? प्रशासनावर दहशत निर्माण करून अशा पद्धतीने नगर शहरात कोणी राजकीय नेता अथवा राजकीय पक्ष भूमिका घेणार असेल तर त्या भूमिकेचे विखे पाटील समर्थन करणार आहेत का असा थेट सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

‘कोठारी’ सार्‍यांच्याच प्रेमात कसा?
महापालिकेत कोणाचीही सत्ता आली तरी रस्त्यांची बहुतांश कामे कोठारीलाच! त्याच्या कामाच्या दर्जाबाबत अनेकदा नागरिकांनी तक्रारी केल्या. पण, त्या तक्रारी केराच्या टोपलीत टाकण्याचे पुण्यकर्म भाजपा, सेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस अशा सार्‍याच त्या-त्यावेळच्या सत्ताधार्‍यांनी केले. कोठारीबद्दल आता तक्रार करणार्‍या आणि त्याच्यावर कारवाईची मागणी करणार्‍या शिवसेनेचा हाच कोठारी कधीकाळी जावई झाला होता. सार्‍यांनाच मलिदा वाटण्यात माहिर आणि त्याच्या मलिद्यास जागणार्‍या सार्‍याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्याच्या मिठाला जागण्याशिवाय पर्यायच नसतो. आयुक्त नव्याने आले आहेत. त्यांना अद्याप कोठारीचे ‘मीठ’ गेले नसावे! त्यांनी हे मीठ टेस्ट सुद्धा करू नये अशी नगरकरांची अपेक्षा आहे. कोठारीवर काय कारवाई होणार याकडे सामान्य नगरकरांचे लक्ष लागून आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!