सारिपाट – ‘पब्जी’च्या विळख्यात तरुणाई

जीवाला घोर लावणार्‍या ‘गेम्स’ ; पालकांनी सजगता दाखवत पाल्यांवर लक्ष देण्याची गरज 

सारिपाट / शिवाजी शिर्के
पब्जी नावाचा गेम आणि त्याच्या आहारी जाणार्‍या तरुणांसह तरुणींची संख्या वाढत चाललीय. आंबी नावाच्या छोट्याशा खेड्यात पब्जीच्या आहारी जाण्यानं तरुणानं आत्महत्या करण्याची घटना घडली आणि आता जिल्ह्यात टाकळीभान येथे आयटी इंजिनिअर झालेल्या तरुणाने आत्महत्या केली. त्यामुळेच याबाबत पालकांमध्ये जागृती होण्याची आवश्यकता आहे. पती पब्जीच्या आहारी गेल्यानं पत्नीनं आत्महत्या केल्याचं प्रकरण तर सार्‍यांनाच काळजीत टाकणारं ठरलं.
पब्जी या गेममध्ये बंदुका, लाटणं, तवा यासारखं जे काही असेल ते घेऊन हाणामारी करण्याचे प्रकार आहेत. पॅराशूट घालून एका बेटावर उड्या टाकायच्या आणि राडा करायचा असाच काहीसा हा गेम. या गेममध्ये ऑनलाईन असणारे सारेच सहभागी होत असल्याने दुसर्‍याला गेमच्या माध्यमातून मारल्याचा काल्पनीक आनंद घ्यायचा असाच काहीसा हा गेम.
पब्जी या गेमची मुळ कल्पना आहे ती एका जापनीज फिल्मची. बॅटल रॉयल या नावानं एक फिल्म तयार करण्यात आली. या फिल्ममध्ये एक शिक्षक एका बेटावर आपल्या १०० विद्यार्थ्यांना सोडून देतो. त्यांच्यात हाणामारी होते आणि एकमेकांचे खून करून शेवटी एकजणच जिवंत राहणार असतो. काहींच्या मते हा सिनेमा खर्‍या घटनेवर आधारीत आहे. या सिनेमावर प्रभावीत होऊन दक्षणि कोरीयाच्या ब्लुहोल कंपनीने ही गेम डेव्हलप केली. आर्मीच्या गेम खुप झाल्या असतानाही त्यातील हाणामारी काही संपत नसल्याने ही गेम तयार केल्याचे बोलले जाते. त्या हाणामारीत कपड्यांपासून ते अन्य गोष्टींवर प्रयोग करण्यात आले.
पब्जी हे गेम प्रसिद्धीस आला आणि त्याचे दुष्परीणाम लागलीच समोर आले. सप्टेंबर २०१८ च्या दरम्यान हा गेम अँड्राइड आणि आयओएस वर येताच सुपरहिट झाला. गेमींग हे एकदा व्यसन झालं की त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच! गेमच्या आहारी जाऊन कोणी आत्महत्या केल्या तर कोणी खून केल्याच्या घटना घडल्या आणि घडत असल्याचे टाकळीभानमधील आयटी तरुणाच्या घटनेने दाखवून दिले. या गेमवर बंदी घालण्यासाठीच्या याचिका राज्यासह देशातील अन्य राज्यांमध्ये दाखल आहेत आणि अद्यापही काही याचिका दाखल होत आहेत.
श्रीरामपूरच्या बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार हे प्रतिष्ठीत कुटुंब. या कुटुंबातील राहुल याचे सहा महिन्यापुर्वीच लग्न झाले होते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला हा आयटी पदवीधर तरुण नोकरीच्या मागे न लागता शेती आणि पोल्ट्रीच्या व्यवसायात उतरला. त्यात त्याला चांगले यशही येत राहिले. दरम्यानच्या कालावधीत विवाहबद्ध झालेला हा तरुण त्याआधीपासूनच पब्जीच्या आहारी गेल्याचे समोर येत आहे. अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतलेला हा नुकताच विवाहबद्ध झालेला हा तरुण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पब्जी गेम खेळत होता अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांकडून समजत आहे.
राहुलच्या आत्महत्येने सार्‍यांनाच हादरवले आहे. आपली मुले हातात मोबाईल घेऊन नक्की काय करतात, कोणता गेम खेळतात हे पाहण्याची साधी तसदी पालक घ्यायला तयार नाहीत. उलटपक्षी पाहुणे आणि मित्र परिवारात आपल्या मुलाला मोबाईलचे किती वेड आहे आणि त्याला कोणत्या- कोणत्या गेम खेळता येतात याचे कौतुक करण्यात पालकांना फुशारकी वाटते. त्यातूनच मुलांचे फावते आणि नको ती घटना घडते. मोबाईलच्या आणि मोबाईलमधील गेमच्या आहारी गेलेली मुले- मुली घरी येणार्‍या पाहुण्याचा मोबाईल पटकन हातात घेतात आणि त्या मोबाईलमध्ये कोणत्या गेम्स आहेत याचा शोध घेतात. याचाच अर्थ अशी मुलं- मुली ही गेमच्या पुरती आहारी गेलीय हे पालकांनी समजून घेण्याची गरज आहे.
पब्जीसारख्या वैफल्यावस्था निर्माण करणार्‍या गेम आणि तत्सम गोष्टींच्या आहारी आपला पाल्य गेला नाही याची काळजी आता पालकांनीच घेण्याची आवश्यकता आहे. मुला- मुलींनी देखील असल्या गेमपासून चार हात दूर राहण्याची गरज आहे. भावनेच्या भरात आपण असले आत्महत्येचे पाऊल उचलत असताना आपल्या पालकांचा आणि त्यांच्या भविष्याचा आपण विचार केला पाहिजे. खरे तर याबाबत सर्वच बाबतीत प्रबोधन होण्याची गरज असून त्यासाठी सामाजिक संस्थांनी चौकाचौकात आणि महाविद्यालय परिसरात प्रबोधन करण्याची गरज आहे. त्यातूनच या समस्येतून मार्ग निघू शकेल.
You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!