सारिपाट / शिवाजी शिर्के… ‘समद’ ची अंडा गँग ‘खाकी’ची जावई आहे का?

सारिपाट / शिवाजी शिर्के

एसपी साहेब, पाणी मुरतंय! आदेश दिल्यानंतरही अंडा गँगविरोधातील मोक्काचा प्रस्ताव नाशिकला पोहोचलाच नाही

गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळख असलेल्या ईशू सिंधू यांच्यासारख्या खमक्या पोलिस अधीक्षकांनी नगरची सुत्रे हाती घेतली आणि वाळू तस्करांसह अनेकांची पाचावर धारण बसली. हप्तेखोरी करणार्‍यांची बोलती बंद झाली आणि त्यांनीही गपगुमानं कारवाया सुरू केल्या. मात्र, असे असताना पोलिस अधीक्षकांना उल्लू बनविण्याचे काम त्यांच्याच कार्यालयातून झाले की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मुकुंदनगरच्या अंडा गँग विरोधात मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आला असल्याचे दस्तुरखुद्द पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी दीड महिन्यांपूर्वी (दि. 15 मार्च) रोजी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, अद्यापपर्यंत असा कोणताही प्रस्ताव नाशिकच्या संबंधित कार्यालयास प्राप्तच झाला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याचाच अर्थ एक तर पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी पत्रकारांना खोटी माहिती दिली किंवा सिंधू यांनी आदेश देऊनही खालच्या अधिकार्‍यांनी हा प्रस्ताव मुद्दाहून दाबून ठेवला! एसपी साहेब, नगरकरांना यानिमित्ताने प्रश्‍न पडलाय तो हा की, ‘समद खान व त्याची गँग खाकीची जावई आहे काय? एसपी म्हणून तुमचे आदेशही जर कनिष्ठ अधिकारी पाळत नसतील तर याचा अर्थ काय? खाल्या मिठाला कोण जागत आहे
मराठवाड्यातील गुन्हेगारांचा अड्डा आणि आश्रयस्थान अशी नवी ओळख नगरच्या मुकुंदनगरची झाली. मुकुंदनगरमध्ये जी परिस्थिती आहे ती भयानकच! जीव मुठीत धरून येथील अनेक कुटुुंब आला तो दिवस घालवत असताना येथील गुन्हेगारी कमी करण्यास पोलिस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली असल्याचे सिद्ध झाले आहे. मुकुंदनगर भागात कार्यरत असलेल्या राष्ट्रवादीचा नगरसेवक समदखान या टोळीचा प्रमुख असून त्याच्यासह 20 जणांविरुद्ध अंडा टोळीविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोका) कारवाईचा प्रस्ताव नाशिक विभागीय विशेष पोलिस महानिरिक्षकांकडे दाखल केला असल्याचे पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी दीड महिन्यांपूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. नगरसेवक समद खान वहाब खान याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दहशत निर्माण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, जमाव जमवून तसेच घरास घुसून दहशत निर्माण करणे आदी स्वरुपाचे 11 गुन्हे दाखल आहेत. तर याच टोळीतील जैयद रशीद सय्यद उर्फ टप्या, समीर जाफर उर्फ सॅम याच्याविरुद्ध प्रत्येकी सात, मुजीब अजीबखान उर्फ भुर्‍या याच्याविरुद्ध आठ, सैफुल रशीद सय्यद मजीद समदखान, नासीर बहाव खान, सय्यद तारीफ आसीफ, टप्याचे वडील, रुखसाना अजीज खान, साहिल पचास रिक्षावाल्याचा मुलगा, माया, दानिश नासिर खान, समदखानची पत्नी, मुदस्सद अजीज खान उर्फ कल्या, जाहिद खान, मोईन नासीर खान, सोफीयान समदखान, इकबाल शेख व शेख अजहर कुतुबद्दीन उर्फ नाना (सर्व रा. मुकुंदनगर) यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे त्यावेळी पोलिस अधीक्षकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.


मुकुंदनगरमध्ये कायमच अशांतता असते. आता अलिकडील दि. 17 जानेवारीला दोन गटात दंगल झाली. दगडफेक, लाकडी दांडके, सळई, तलवारीने दहशत निर्माण करण्यात आली होती. तसेच काही दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक रंजकुमार शर्मा यांनी गंभीर दखल घेत टोळीविरोधात मोका कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना त्यांनी केली होती. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे तत्कालिन सहायक निरिक्षक संदीप पाटील व उपनिरीक्षक एस.पी. कवडे यांनी शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तो तयार केला. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक ईशु सिंधू यांच्या आदेशाने नाशिक विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे सादर करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात असा कोणताही प्रस्ताव आजपर्यंत नाशिक कार्यालयास प्राप्तच झाला नसल्याची माहिती पुढे आली आहे.


पोलिस अधीक्षक साहेब, तुमच्याकडून नगरकरांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पुर्ती आपणाकडून होईल अशी भाबडी अपेक्षा ते ठेवून असताना तुम्ही दिलेले आदेशच जर तुमची यंत्रणा पाळत नसेल तर सामान्य जनतेचे काय? समद खान व त्याच्या सहकार्‍यांच्या विरोधातील मोक्कानुसार तयार झालेला प्रस्ताव दिड महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही जर वरिष्ठांकडे सादर केला जात नसेल तर ‘दाल मे काला है’, असे म्हणण्यास संधी मिळतेय. एसपी साहेब, ‘आमचे कुणीच जावई नाही आणि जावई म्हणून कोणा गुन्हेगाराचे लाड कोणी पोलिस अधिकारी करत असेल तर त्यालाही मी सोडत नाही’, हे कृतीतून तुम्हाला दाखवून द्यावे लागणार आहे इतकेच!

समद खान याचा असा आहे जीवन प्रवास!
शिवसेनेचे तत्कालीन नेते जगदिश भोसले यांचा खून कोणी केला? समीर खान नामक गुंडाने. समीर खान याचा पंटर म्हणून त्यावेळी कोण वावरत होता? समद खान! समद खानचे उत्पन्नाचे साधन / व्यवसाय काय होता त्यावेळी? स्टोव्ह रिपेअर करण्याचे दुकान! पुढे जगदीश भोसले यांचा खून करणार्‍या समीर खानचाही मर्डर झाला आणि मग त्याचा पंटर म्हणून काम पाहणारा समद खान त्या गँगचा प्रमुख झाला आणि पुढे हाच समद खान मुकुंदनगरचा बादशाह म्हणून वावरू लागला! महापालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहणार्‍या समद खान याच्यावर खून, मारामार्‍या यासह अनेक गंभीर स्वरुपाचे जवळपास अर्धशतक पुर्ण होईल अशा गुन्ह्यांची संख्या आहे.

पीस फौंडेशनची जनहित याचिका!
मुकंदनगरमध्ये कायदा व सुव्यवस्था राहावी आणि शांतता निर्माण व्हावी या उद्देशाने गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या अंडा गँगचा प्रमुख असणार्‍या समद खान याच्यासह त्याच्या साथीदारांवर मोक्कानुसार कारवाई व्हावी आणि गुन्हेगारा पार्श्‍वभूमीच्या लोकांवर कारवाई होण्याच्या मागणीसाठी पीस फौंडेशनचे अध्यक्ष आर्किटेक्ट अर्षद शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका खंडपीठाने दाखल करून घेतली आणि त्यावर म्हणणे मांडण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षकांपासून राज्याच्या गृह सचिवांना नोटीसा काढल्या. मात्र, सदरच्या नोटीसा या नगरच्या पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून संबंधितांना जाणिवपूर्वक पाठविल्या गेल्या नसल्याचा गंभीर आरोप अर्षद शेख यांनी केला आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!