संपत्तीपेक्षाही ध्यानधारणेतून प्राप्त होणारी मानसिक शांती मोठी : पूज्य श्री शिवमुनीजी महाराज

आनंदधामच्या प्रांगणात आयोजित आत्मध्यान शिबिराला साधकांचा मोठा प्रतिसाद
अहमदनगर / नगर सह्याद्री –
प्रत्येक मुनष्याला आपल्या जीवनात जे जे काही हवे असते त्याची प्राप्त करण्याची ताकद त्याच्या स्वत:मध्येच असते. प्रत्येकाच्या देहात परमात्म्याचा  अंश आहे. दुर्देवाने त्यालाच सर्वजण विसरतात. त्यासाठीच आत्मध्यान अत्यंत महत्त्वाचे आहे. ते केल्यानेच प्रत्येकाला सुखी जीवनाचा अर्थ समजू शकतो. आत्मधानाने जीवन सुखमय होण्यास मदत होईल व एक सकारात्मक दृष्टीकोन तयार होण्यास मदत होईल. परमेश्वराने दिलेल्या जीवनरुपी सुंदर रोपट्याचे अतिशय चांगले संगोपन केले पाहिजे. ध्यानधारणेतून प्राप्त होणारी मानसिक शांतता कोणत्याही सुखसंपत्तीपेक्षा मोठी आहे, असे प्रतिपादन युगप्रधान आचार्य सम्राट श्री शिवमुनीजी महाराज यांनी केले.
तब्बल 20 वर्षानंतर श्री शिवमुनीजी महाराज यांचे नगरच्या भूमीत आगमन झालेले असून त्यांच्या सान्निध्यात आनंदधामच्या पवित्र प्रांगणात आत्मध्यान साधना शिबिराला प्रारंभ झाला आहे. या शिबिरात मार्गदर्शन करताना पूज्य श्री शिवमुनीजी महाराज बोलत होते. या शिबिरात नगर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, जम्मू, पंजाब, हरियाणा आदी भागातून आलेले सुमारे 1800 साधक सहभागी झाले आहेत. शिबिरात सर्वांना सत्याचा शोध घेताना, जीवन जगण्याची कला शिकवण्यात येत आहे. जीवनात आनंद, शांती आणि ज्ञान प्राप्ती करीत सुखी होण्याचा राजमार्ग कसा तयार करावा याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. पूज्य महामंत्री शिरीषमुनीजी यांनी प्रार्थनेचे महत्त्व विशद करीत आत्मध्यानाचा परिचय करून दिला. ध्यानगुरु शिवाचार्य श्री यांनी आत्मध्यानचा पहिला प्रयोग करून घेत साधकांना आत्मबोधाचा मार्ग दाखवला. शिबिरात सूक्ष्म व्यायाम, प्राणायाम, प्रार्थना, माता पिता, गुरुदेव यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे, योग निद्रा, तालबध्द श्वसन क्रिया आदींबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
सायंकाळी आलोचना मंगलमैत्रीचा प्रयोग शिवाचार्यश्रीजी यांनी करून घेतला. या शिबिरावेळी पूज्य श्री शिवमुनीजी महाराज, युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज, पूज्य शिरीषमुनीजी महाराज, पूज्य शुभममुनीजी महाराज, पूज्य पद्मऋषीजी महाराज उपस्थित होते. त्यांच्या सान्निध्यात मुख्य प्रशिक्षक निशा जैन, शिबीर समन्वयक सुशिल जैन, कांताबेन पारख यांनी दिवसभर शिबिराची व्यवस्था पाहिली. शिबिराअंती महासतीजी अर्चनाजी महाराज, पूज्य पियुषदर्शनाजी, डॉ.सुधा कांकरिया आदींनी आपले अनुभव कथन करून शिबिरातील मार्गदर्शनासाठी कृतज्ञता व्यक्त केली. या शिबिराची संपूर्ण नियोजन व्यवस्था जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत, सेके्रटरी संतोष बोथरा, उपाध्यक्ष आनंदराम मुनोत, सतीश लोढा, संतोष गांधी, अभय लुणिया, आनंद चोपडा, नितीन कटारिया आदींसह श्रावक संघाने पाहिली.
या शिबिरासाठी रोशन चोरडिया, सरोज कटारिया, नवरतन डागा, रुपेश पारख, मनिषा मुनोत, ज्योती पितळे, आनंद चोपडा, प्रितम गांधी, नितीन शिंगवी, नितीन कटारिया, अनिल दुगड, दीपा कोठारी, नेहा लुणावत, नवनीत गांधी, नकुल फिरोदिया आदींनी परिश्रम घेतले. दि.16 जून पर्यंत आत्मध्यान साधना शिबीर दररोज सकाळी 10 ते दुपारी 4 यावेळेत होणार आहे.
शिबिर कालावधीत सर्व साधकांच्या गौतमप्रसादीची व्यवस्था सौ.सविता रमेश फिरोदिया यांच्यावतीने करण्यात आली आहे. आत्मध्यान शिबिरात संपूर्ण पाच दिवस आबालवृध्द साधक आनंदधाम येथेच निवास करणार असून प्रत्येकाला पहिल्याच दिवशी अनोखी अनुभूती आल्याने साधकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. आनंदधाम परिसरात चैतन्यमय वातावरण तयार झाले असून प्रत्येक जण अधिकाधिक आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी अतिशय उत्सुक असल्याचे पहायला मिळत आहे.
You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!