मोदी-शहा आचारसंहिता भंग प्रकरण; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला नोटीस

नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात आदर्श आचारसंहिता भंग प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र त्यावर निवडणूक आयोगाने अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे काँग्रेस खासदार सुश्मिता देव यांनी सुप्रीम कोर्टात तक्रार दाखल केली. त्याची दखल घेऊन आता सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.

कोर्टाने शहिदांचा वापर निवडणूक प्रचारामध्ये करु नये अशी भूमिका घेतली होती. त्याला निवडणूक आयोगानेही समर्थन दिले होते. त्यानंतर यासंदर्भात मोदी आणि शहा यांच्या विरोधात निवडूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये मोदींच्या वक्तव्यांचा दाखला देण्यात आला होता. मात्र त्यावर आजपर्यंत निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच त्यानंतरही मोदी आणि शहा यांच्या विरोधात अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या. मात्र त्यावरही आयोगाने कोणतीही कारवाई केलेली नाही. आता या प्रकरणी न्यायालयाने दखल घेतली असून निवडणूक आयोगाला नोटीस काढली आहे. तसेच याबाबतची पुढील सुनावणी येत्या २ मे रोजी ठेवण्यात आली आहे. 

उल्लेखनिय बाब म्हणजे मुख्य निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधातील तक्रारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आयोगातील इतर सदस्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत काय झाले ते अजूनही समजू शकले नाही.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!