नगरमध्ये केक कापून साजरा केला झाडांचा वाढदिवस

अहमदनगर / नगर सह्याद्री
आजवर आपण अनेक वाढदिवस पाहिले असतील. पण, नगरमध्ये साजरा झालेला असा हटके वाढदिवस मात्र पाहिला नसेल. नगरमध्ये बुधवारी (दि.१२) साजऱ्या झालेल्या वाढदिवसात नेहमीच्या वाढदिवसाप्रमाणे फुगे, संगीत इतकेच नव्हे तर केकही होता. पण, विशेष असे की, हा वाढदिवस कोणा एखाद्या व्यक्तिचा नव्हता तर, तो विविध झाडांचा होता. पर्यावरण संवर्धन आणि रक्षण आपले कर्तव्य माणून  सावेडी परिसरात लावलेल्या वृक्षांचा उत्साही वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.

शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मागील वर्षी नगरसेवक कुमार वाकळे यांनी सावेडी गाव परिसरात विविध प्रकारच्या झाडांची रोपे लावली होती. त्यांनी व परिसरातील नागरिकांनी गेले वर्षभर या झाडांचे चांगले संगोपन केल्याने ही झाडे वर्षभरातच चांगली बहरली आहेत.बुधवारी (दि.१२) आ. जगताप यांच्या वाढदिवसाच्या दिवशी या झाडांनाही १ वर्ष पूर्ण झाल्याने या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. माणिकराव विधाते, नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, बाळासाहेब बारस्कर, डॉ.गांगर्डे, दादासाहेब दरेकर, गजेंद्र भांडवलकर, भरत गारुडकर, माऊली जाधव, वैभव म्हस्के,पवन कुमटकर, सुनील भालेराव, मोहन गोरे, संपत वाकळे, गणेश गोरे, दशरथ वाकळे, नवनाथ कोलते आदी उपस्थित होते.

झाडाच्या नावानं केकही कापला

सावेडी गाव परिसरात झाडांना सजवण्यात आले. त्यांना फुगे बांधण्यात आले. परिसर स्वच्छ करण्यात आला. कारण या झाडांना लावून आता वर्ष झालंय.  या वर्षपूर्तीनिमित्त त्यांचा वाढदिवस साजरा कऱण्यासाठी हा सगळा प्रकार परिसरातील नागरिकांनी केला. झाडांना औक्षण करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ही झाडं जगवण्यासाठी ज्या लहानगण्यांनी परिश्रम घेतले त्यांनी झाडाच्या नावानं केकही कापला. तब्बल वर्षभरापूर्वी या परिसरात ही झाडं लावण्यात आली होती. अनेक अडचणीनंतरही ही झाडं तगली आणि म्हणूनच या झाडांचा हा वाढदिवस दिमाखात साजरा करण्यात आल्याचे नगरसेवक कुमार वाकळे यांनी सांगितले.

झाडांच्या वाढदिवसाचा आनंद वेगळाच

परिसरातील मोठ्यांसोबत लहानग्यांनी ही झाडं जगवण्यासाठी मेहनत घेतली. आणि त्यामुळंच हा वाढदिवस साजरा करतांना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं लावली जातात. मात्र त्यांना जपण्याकडं दुर्लक्षच होत असतं,  मात्र या ठिकाणी झाडं लावण्याचही आली आणि ती जगवण्यातही आली, ही एक चांगली सुरुवात झाल्याचा आनंद झाडांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून पहायला मिळाला असल्याचे प्रा.माणिकराव विधाते यावेळी म्हणाले. अनोख्या पद्धतीने केलेल्या वाढदिवसाला लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!