‘धोनी निवृत्तीचा विचार करु नकोस, देशाला तुझ्या खेळाची गरज’

 

नवी दिल्ली –  “नमस्कार एम एस धोनी. तुम्हाला निवृत्ती घ्यायची आहे असं माझ्या कानावर आलं आहे. कृपया तुम्ही असा विचार करु नका. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे. निवृत्तीचा विचारही तुम्ही मनात आणू नका अशी माझी विनंती आहे”, असं लता मंगेशकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या सध्या चर्चा सुरु आहेत. खासकरुन उपांत्य फेरीत न्यूझीलंड संघाकडून झालेल्या पराभवानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. यादरम्यान गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी धोनीला तू निवृत्तीचा विचार करु नकोस असा आपुलकीचा सल्ला दिला आहे.

ट्विटरच्या माध्यमातून लता मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी लता मंगेशकर यांनी अजून एक ट्विट करत भारतीय संघाचं मनोबल वाढवण्यासाठी एक गाणं शेअर केलं आहे. काल भलेही आम्ही जिंकलो नसलो, तरी हरलेलो नाही असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला धोनीच्या निवृत्तीबद्दल विचारलं असता त्यानेही महेंद्रसिंह धोनीने आम्हाला त्याच्या पुढील योजनांसंदर्भात काहीच सांगितलेले नाही, असं स्पष्टीकरण देत निवृत्तीच्या अफवा फेटाळून लावल्या.

भारताने न्यूझीलंडकडून १८ धावांनी पराभव पत्करला. भारताच्या धावसंख्येत धोनीने ७२ चेंडूंत साकारलेल्या ५० धावांचे महत्त्वाचे योगदान होते. परंतु मधल्या षटकांमधील धोनीच्या संथ फलंदाजीची कोहलीने पुन्हा पाठराखण केली. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होणार आहे. धोनीच्या फलंदाजीबाबत स्पष्टीकरण देताना कोहली म्हणाला, ‘‘धोनीने एक बाजू संयमाने सांभाळत रवींद्र जडेजाला मुक्त फटकेबाजीची संधी देण्याची आवश्यकता होती. संघाची ही गरज समजून त्याने परिस्थितीनुरूप योग्य भूमिका घेतली. कठीण स्थितीतून संघाचा डाव सावरत त्यांनी शतकी भागीदारी रचली.’’

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!