के के रेंज हद्दीत स्फोट ; खारे कर्जुनेतील दोन जण ठार

अहमदनगर / नगर सह्याद्री
एमआयडीसी हद्दीत असणाऱ्या लष्कराच्या के के रेंज भागामध्ये रात्रीच्या सुमाराला स्फोट होऊन यामध्ये खारे कर्जुने गावातील 2 जण ठार झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आलेली आहे.

या घटनेमध्ये अक्षय नवनाथ गायकवाड (वय 19) आणि संदीप भाऊ साहेब तिरवडे (वय 32, राहणार खारे कर्जुने) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन जणांची नावे आहेत. काल रात्रीच्या सुमाराला साधारण साडे अकराच्या वेळेला हे दोन जण बहुधा या ठिकाणी असलेले भंगार गोळा करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी असलेल्या वस्तूचा स्फोट झाला स्फोट एवढा भयानक होता की त्याचा आवाज आजूबाजूला आल्यानंतर तत्काळ लष्करातील अधिकारी तसेच नागरिक या ठिकाणी गोळा झाले. तेव्हा हे दोन जण या ठिकाणी पडलेले दिसून आले.

या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बोरसे यांनी तत्काळ या दोन जणांना जिल्हा रुग्णालयामध्ये हलवले.

दरम्यान नगर जिल्ह्यातील के के रेंज मध्ये याअगोदर सुद्धा अशा प्रकारच्या घटना अनेक वेळा झालेल्या होत्या. या ठिकाणी लष्कराचा सराव मोठ्या प्रमाणात चालतो. आजूबाजूच्या गावाचे या ठिकाणी राहत असतात, या ठिकाणी स्फोट झाल्यानंतर तेथे पडणारे भंगार गोळा करण्यासाठी अनेक जण जात असतात. त्या सुमाराला हे दोघेजण त्याच पद्धतीने गेले असावे अशी माहिती पोलिसांच्या हाती आलेली आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे पोलीस निरीक्षक बोरसे यांनी सांगितले आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!