एक्झिट पोलच्या अंदाजाने शेअर बाजारात तेजी

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमतातील सरकार येणार असल्याचा अंदाज विविध संस्थांनी वर्तवल्यानंतर शेअर बाजारानेही ९०० अंकांची उसळी घेत या अंदाजाला सलामी दिली. मुंबई शेअर बाजाराबरोबरच निफ्टीही वधारला. डॉलरच्या तुलनेत रुपयाही वधारला.

भाजप स्थिर सरकार स्थापन करणार असल्याचा अंदाज रविवारीच विविध संस्थांनी व्यक्त केला. त्याचे परिणाम सोमवारी दिसून आले. सोमवारी सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया ८६ पैशांनी वधारून ६९. ३६ वर गेला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने पहिल्या तासाभरातच ९५१ अंशांची झेप घेत ३८ हजार ८८२ चा टप्पा गाठला. निफ्टीही २८४ अंशांनी वधारून ११ हजार ६९१ वर गेला.

 

गेल्या काही दिवसापांपासून भांडवली बाजारात संभ्रमाचे वातावरण होते. सपा आणि बसपा युती उत्तर प्रदेशात चांगली कामगिरी करतील आणि त्याचा मोठा फटका भाजपला बसेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. केंद्रात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, अशी शक्यताही व्यक्त केली जात होती. त्यामुळे गुंतवणूकदार सावध पवित्र्यात होते. त्यामुळेच १ मे ते १५ मे या कालावधीत निर्देशांकात १ हजार ९१३ अंकांची घसरण झाली होती. मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानी संभ्रमाचे मळभ दूर झाले.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!