ईव्हीएममध्ये मोठा घोळ -राज ठाकरे

नवीदिल्ली – ईव्हीएमध्ये मोठा घोळ झाला आहे, जे जिंकले आहेत त्यांना जिंकून कसे आलो याबाबत शंका आहे. मतदाराना त्यांनी कुणाला मतदान केलं ते समजलं पाहिजे. मी त्याच संदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा आहे. कारण त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते त्यावरूनच हे लक्षात येत होतं की त्यांना आमच्या बोलण्यात काहीही स्वारस्य नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं. तसंच मी बॅलेट पेपरची मागणी केली आहे. मी औपचारिकता म्हणूनच भेट घेतली आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

२०१४ च्या आधी भाजपा या ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवत होता. मात्र २०१४ नंतर त्यांनी हा विषयच सोडून दिला असाही आरोप राज ठाकरेंनी केला आहे. ३७० मतदारसंघांमध्ये घोळ आहे. लोकांनी मतदान केलं आहे त्यापेक्षा जास्त मतदान नोंदवलं गेलं आहे. हे जे घोळ समोर येत आहेत त्यामुळे बॅलेट पेपरची पद्धत पुन्हा आणली गेली पाहिजे. भारतासारख्या देशात जिथे निवडणूक महिनाभर किंवा दोन महिने चालते तिथे मतमोजणीला दोन दिवस गेले तर काय बिघडतं? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन जी मतमोजणी होईल त्यानंतर जो निकाल लोकांसमोर येईल त्यात लोकांना समाधान असेल की यामध्ये पारदर्शकता आहे.

बॅलेट व्होटींगवर निवडणूक आयोगाने यावं अशी आमची मागणी होती. मात्र त्यांच्याकडून शून्य अपेक्षा आहेत एक औपचारिकता म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे. उद्या कोणी हे म्हणायला नको की बॅलेट पेपरची मागणी होती तर राज ठाकरे निवडणूक आयोगाकडे का गेले नाहीत? औपचारिकता असल्याने ही भेट घेतली आहे. निवडणूक आयोग आमचं ऐकेल, आमच्या मागणीचा विचार होईल असं वाटत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

यापुढच्या म्हणजेच महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातच मी निवडणूक आयोगाकडे आलो होतो आणि ती निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली. मी मागच्या ऑगस्ट महिन्यात भारतातल्या प्रमुख राजकीय पक्षांना पत्र पाठवलं होतं त्यात मी ईव्हीएम बंद करण्याची मागणी केली होती. तेव्हा माझं कुणीही ऐकलं नाही आता मी यासंदर्भात निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे. निदान आता तरी राजकीय पक्ष माझ्या मागणीचा विचार करतील असं वाटत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

मॅच फिक्स असेल तर तयारी करण्याला काय अर्थ आहे असंही राज ठाकरेंनी विचारलं आहे. तसंच ईव्हीएमची चीप अमेरिकेहून येत असेल तर हॅकिंगची शक्यता आहेच असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!