अवजड वाहनचालकांना मारहाण करून पैसे लुटणार्‍या टोळ्या बायपासवर कार्यरत

अहमदनगर । नगर सह्याद्री 

खराब बायपास रस्त्यावरून वाहने जात असताना रस्त्यावर वाहने अडवून वाहनचालकांना लुटण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकार वाढले आहेत. वाहनचालकांना मारहाण करून त्यांच्याजवळील पैसे लुटून नेणार्‍या टोळ्या बायपास रस्त्यावर कार्यरत झाल्या आहेत.

नगर शहरात ट्रक, कंटेनरसारखी अवजड वाहने येऊ नयेत म्हणून शहराबाहेरून 29 किलोमीटरचा बायपास रस्ता आहे. हा संपूर्ण बायपास रस्त्या खराब झाला आहे. या बायपासवरील विळद घाट ते पुणे महामार्गादरम्यान रस्ता दुरुस्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. मध्यंतरी नगर शहरामध्ये अवजड वाहनामुळे अनेक अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे अवजड वाहतूक खराब असलेल्या बायपास रस्त्यावरून जात आहे. या खराब रस्त्यावरून वाहनचालक जात आहेत. त्यात लुटण्याचे प्रकार अनेक दिवसांपासून घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकार वाढले आहेत.

गेल्या आठवडाभरात तीन वाहनाचालकांना रस्त्यात अडवून मारहाण करून लुटले आहे. दोन दिवसांपूर्वीच बायपासवर एका ट्रकचालकाला अडवून चार जणांनी मारहाण करून लुटले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस स्टेशनला चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी किसन महादेव देसाई (रा. आष्टी, बीड) यांनी फिर्याद दिली आहे. देसाई हे सोमवारी रात्री एमआयडीसी बायपासने ट्रक घेऊन जात होते. रेल्वे ब्रीजजवळ आले असताना मालट्रकच्या मागून दोन मोटारसायकवरून आलेल्या चार व्यक्तींना ट्रक थांबविली. चाकूचा धाक दाखवून बळजबरी ट्रकमधील माल व बारा हजार रुपयांची रक्कम लुटून नेली. नगर तालुका, एमआयडीसी, तोफखाना, भिंगार या चार पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा बायपास रस्ता येतो. या चार पोलिस स्टेशनला वाहनचालकांना लुटल्याचे अनेक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

बायपासवर लूटार करणार्‍या अनेकांना पोलिसांनी पकडले होते. काही दिवस हे गुन्हे थांबले होते. आता पुन्हा लुटारीचे गुन्हे सुरू झाले आहेत. एकतर वाहने खराब रस्त्यावरून जातात. त्यात वाहनचालकाला लुटण्यात येत आहे. त्यामुळे बायपासवरून जाणारे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. परप्रांतीय वाहनचालक टार्गेट बायपास महामार्गावरून जाणारे ट्रक, कंटेनरचालक हे परराज्यातील असतात. या वाहनचालकांवर लक्ष ठेवून त्यांना रस्त्यात अडवून लुटण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी या लुटीच्या घटना घडतात. लुटीत कमी रक्कम गेल्यास वाहनचालक तक्रार देण्यास पोलिस स्टेशनला येत नाहीत.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!